मुंबई Shivsena Controversy : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दोन नवनिर्वाचित खासदार हे आमच्या संपर्कात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय. मात्र, हा दावा म्हणजे शिंदे शिवसेनेच्या नेत्यांची बालीश बडबड असून त्यांनी आधी स्वतःच्या पक्षातील नाराज आमदार वाचवावेत, असा टोला शिवसेना गटाचे आमदार सचिन अहिर यांनी लगावलाय. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नऊ खासदार तर शिंदे शिवसेनेकडे सात आमदारांचं संख्याबळ आहे. मात्र, आता सत्ता स्थापनेपूर्वी आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे दोन खासदार संपर्कात असून ते मोदी सरकारला पाठिंबा देतील असा दावा केला.
दोन खासदार संपर्कात : यासंदर्भात बोलताना शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "शिवसेना उबाठा पक्षाच्या दोन नवनिर्वाचित खासदारांनी आम्हाला संपर्क केलाय. या खासदारांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका पटलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत मौलवींचा घेतलेला आधार या नवनिर्वाचित खासदारांना मान्य नाही. या खासदारांना पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्यामुळं हे खासदार आपल्या संपर्कात आहेत."
म्हस्के यांची बालीश बडबड : यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर म्हणाले, "काही लोकांना अजूनही ते गल्लीतीलच नेते आहेत असं वाटतं. त्यामुळं ते त्या पद्धतीची वक्तव्यं करत आहेत. अशा कुठल्याही वक्तव्याला महत्त्व द्यायची आम्हाला गरज वाटत नाही. खरंतर त्यांच्या पक्षातील आमदारांची पिछाडी झालीय." तसंच अशा लोकांकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्याबद्दल विचार करावा त्याची जास्त गरज आहे, असा टोलाही सचिन अहिर यांनी लगावलाय.
केवळ मंत्रिपदासाठी आटापिटा : यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हणाल्या, "नरेश म्हस्के यांना बालीश बडबड करायची सवय आहेच. आता मंत्रिपद मिळवण्यासाठी आणि वरिष्ठांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते अशा पद्धतीची वक्तव्यं करत आहेत. या वक्तव्यांना काहीही अर्थ नाही. त्यांनी कितीही आटापिटा केला तरी श्रीकांत शिंदे यांना डावलून त्यांना मंत्रिपद मिळणार नाही. त्यामुळं त्यांनी हे असले माकडचाळे थांबवावेत."
पक्षांतर बंदी कायदा अडथळा : दरम्यान केवळ दोन खासदारांना पक्षांतर करुन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करता येणार नाही. कारण तसं केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यासाठी शिवसेना उबाठा पक्षातून सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणं गरजेचं आहे. आता सहा खासदारांसाठी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा मिळून ऑपरेशन राबवणार का? आणि ते यशस्वी होणार का? हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचा :