मुंबई Abhishek Ghosalkar Shot Dead : दहीसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिसभाई दोघांचा मृत्यू झालाय. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एक्सवर केली पोस्ट : यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट शेअर केली असून ते म्हणाले आहेत की, "महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात, पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय..आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत!फडणवीस राजीनामा द्या!", असं संजय राऊत म्हणाले आहेत.
जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी? : यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही एक्सवर पोस्ट शेअर केली असून ते म्हणाले आहेत की, "महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं, ही अतिशय गंभीर बाब आहे. ‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो. सरकार कुणाचंही असो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल युपी/बिहारच्या दिशेने होणं ही इथल्या प्रत्येकासाठी शरमेची बाब आहे. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार?", असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
फेसबूक लाईव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद झाले होते, पण ते मिटल्यानं ते एकत्र आले होते. अभिषेक यांना मॉरिसनं स्वतःच्या कार्यालयात बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी जुने वाद विसरून आता नवीन वर्षात नवीन प्रवास सुरू करत असल्याची घोषणा केली. मात्र, तीन मिनिटांचं फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिस हा अचानक फेसबुक लाईव्हमधून उठून गेला आणि नंतर चौथ्या मिनिटाला मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळीबार केला.
हेही वाचा -