मुंबई Sanjay Raut : उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला वेषांतर करून गेले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सरकारवर टीका केली होती. यानंतर आज पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वेषांतरावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय. हे सगळे तोंडं लपवून दिल्लीला जातात, असं संजय राऊत म्हणाले.
विष्णूचे 13 वे अवतार दिल्लीत : संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "महाराष्ट्रात नाटक, संगीत, चित्रपट, राजकारणाला फार मोठी परंपरा लाभली आहे. मराठी रसिक मराठी नाटक आणि रंगभूमीवर प्रेमही करतात. त्यामुळे आपले नवे बारामतीचे जे विष्णूदास आहेत, त्यांना विष्णूदास यासाठी म्हणावं लागलं; कारण विष्णूचे 13 वे अवतार दिल्लीत बसलेले आहेत. त्यामुळे ते विष्णूदास.”
सगळी पोरं हारुन अल-रशीदची : पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, "अजित पवारांनी अभिनयाची नाट्यकला दाखवली आहे. या नाट्यकलेचं नेपथ्य, संगीत, दिग्दर्शन आणि पडद्यामागची पटकथा हळूहळू समोर येईल. मग एकनाथ शिंदे असतील, ते तर मौलवीचा वेश धारण करून दिल्लीला गेले होते. ते अहमद पटेलांना भेटण्यासाठी पूर्वी वेषांतर करून गेले होते, असं त्यांचेच लोक सांगत आहेत. छगन भुजबळ यांनी सीमा भागात बेळगाव लढ्यासाठी वेषांतर केलं होतं. त्यावेळी त्यांना तुरुंगवास झाला होता. देशासाठी, महाराष्ट्रासाठी वेषांतर करणं समजू शकतो; पण एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी नकली दाढी लावून, खोटी नावं वापरून, वेषांतर करून मुंबई-दिल्ली विमान प्रवास केला. तोंडं लपवून दिल्लीला गेले. ही सगळी हारुन अल-रशीदची पोरं आहेत", अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली."
राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात : राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात कशा प्रकारे येऊ शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिंदे-फडणवीस-पवारांनी देशाला दाखवून दिलं आहे. सामान्य माणसाला विमानतळावर अडवलं जातं. माझ्यासारख्या खासदारांना, मंत्र्यांना अडवलं जातं; मात्र देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार वेषांतर करून खोटी कागदपत्रं बनवून दिल्लीला गेले. सीआरपीएफची सुरक्षा व्यवस्था गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. त्यामुळे अमित शाहांनी यांना सोडा असं सीआरपीएफच्या सुरक्षेला आधीच कळवलं होतं. म्हणून यांना सोडलं गेलं. खोटी कागदपत्रं, खोटे बोर्डिंग पास वापरून या लोकांनी मुंबई-दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास केलाय. हे देशासाठी, महाराष्ट्रासाठी अतिशय घातक आहे. दाऊद इब्राहिमला टायगर मेमनला सोडले का? विजय मल्ल्या, मेहुल चौक्सी यांना असंच सोडलं होतं का? हा चिंतनाचा विषय विषय आहे. सीआरपीएफच्या कमांडरना गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय या वेषांतरीतांना प्रवेश मिळूच शकत नाही, असं राऊत म्हणाले.
जेम्स बॉन्ड कुठे होते : "अशाप्रकारे वेषांतर करून विमानतळावरून कोणी दिल्लीला जात असताना आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते? राष्ट्रीय सुरक्षेचे सल्लागार असलेल्या डोवाल यांना आम्ही जेम्स बॉण्ड म्हणतो. ज्यांच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. जेम्स बॉण्डला हे कळंल नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. या वेषांतराच्या प्रकरणात अजित डोवालही सहभागी आहेत का? अशी शंका येतेय," असं राऊत म्हणाले.
सुनिल तटकरे फिरता रंगमंच : अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं जात आहे, असं सुनील तटकरे म्हणाले होते. यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे. या फिरत्या रंगमंचानेच अजित पवारांना अडचणीत आणण्याचं काम केलं आहे. काही गोष्टी गोपनीय असतात. चोराने चोरासारखंच वागलं पाहिजे. ज्यांनी गुन्हा केलाय तो गुन्हेगारच असतो. गद्दार आणि जे बेईमान आहेत त्यांनी स्वाभिमानाचा आव आणला तर तुम्हीच अडचणीत याल, असा टोला संजय राऊत यांनी सुनील तटकरे यांना लगावला.
तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही : काल (मंगळवारी) मराठा क्रांती ठोक मोर्चानं उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं; परंतु आंदोलक भाजपाचे होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "हे सर्व भाजपाचं कटकारस्थान आहे. याला फडणवीस टच म्हणतात. जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात मराठी माणसाला सुख, शांती मिळणार नाही. चुकीचे आणि बेईमान लोकं सत्तेवरून जात नाहीत, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही; परंतु आगामी काळात आम्ही सत्तांतर करू आणि ज्यांनी सत्तेचा गैरवापर केलेला आहे, आर्थिक गैरवापर केलेला आहे अशा लोकांवर खटले दाखल करावे लागतील, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा
- आमदार अमोल मिटकरी यांची कार फोडणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू, पोलिसांकडून 50 जणांवर गुन्हा दाखल - Amol Mitkari Vs Raj Thackeray
- निवडणुकीपूर्वी सरकारकडून निर्णयाचा सपाटा; राज्यात 81 हजार कोटींची गुंतवणूक, 20 हजार रोजगारनिर्मितीचा दावा - Maharashtra Government Investments
- राजू शेट्टी महाविकास आघाडीसह महायुतीला देणार आव्हान, विधानसभा निवडणुकीकरिता काय आखलीय रणनीती? - Raju Shetti News