कोल्हापूर Shivajirao Adhalrao Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे म्हाडाचं अध्यक्ष पद दिलं म्हणजे मला गप्प बसवण्यासाठी दिलं असा गैरसमज कोणीही करुन घेऊ नये. मी 2024 ला लोकसभा निवडणूक लढवणार आणि महायुतीचाच उमेदवार राहणार, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलाय. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. तसंच निवडून आलेला खासदार गेल्या पाच वर्षांपासून लोकांना दिसला नाही, मात्र मी खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस काम करतोय, अनेक विकासकामं केले आहेत, असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केलाय.
महायुतीचा उमेदवार मीच : कोल्हापुरात शिवसेनेचं अधिवेशन झालं. या अधिवेशनामुळं राज्यातील शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार व शिवसेना नेते कोल्हापुरात आले होते. या सर्व नेत्यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही अंबाबाईचं दर्शन घेतलं. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना नुकतंच पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देण्यात आलंय. मात्र, यामुळं शिरुर लोकसभेच्या रिंगणातून आढळरावांना बाहेर काढल्याची चर्चा आता रंगू लागली होती. मात्र, यावर पहिल्यांदाच आढळराव पाटील यांनी भाष्य केलंय. यावर बोलताना ते म्हणाले, "गरिबांना घर मिळणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ग्रीन प्रोजेक्ट आहे. गोरगरीब जनतेला घरं मिळण्याचा संकल्प आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन. मात्र, याचा अर्थ असा नाही की मी लोकसभा लढवणार नाही. मला गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं असा कुणीही गैरसमज करून घेऊ नये. मी 2024 ला लोकसभा निवडणूक लढवणार आणि महायुतीचाच उमेदवार राहणार यात तीळ मात्र शंका नाही." त्यामुळं त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एकप्रकारे आपल्या उमेदवारीची घोषणाच केलीय. तसंच गेल्या दीड वर्षापासून म्हाडाचं अध्यक्ष पद मला देणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात होतं. निवडणूक आणि या पदाचा काही एक संबंध नसल्याचं आढळराव पाटील म्हणाले.
निवडून आलेला खासदार लोकांना दिसलाच नाही : कोल्हापूरातील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यातील 48 जागा जिंकण्याची व्यूहरचना आखण्यात येत आहे. काहीही झालं तर 48 जागा निवडून आणण्यासाठी आम्ही चंग बांधलाय. शिरुर मतदार संघावर महायुतीतील सर्वच पक्ष दावा करतात. मात्र खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षांपासून मी रात्रंदिवस काम करतोय अनेक विकास कामं केली आहेत. इथं निवडून आलेला खासदार गेल्या पाच वर्षांपासून लोकांना दिसलाच नाही. मात्र, लोकांसाठी खासदार नसून सुद्धा मीच काम करत होतो. यामुळं मी लोकसभा निवडणूक लढवणारच असा दावा देखील त्यांनी यावेळी केलाय.
हेही वाचा :