पुणे Shirur Lok Sabha Constituency : शिरुर लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून शिवाजी आढळराव पाटील हे उमेदवार आहेत. दोन दिवसांपूर्वी आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. आज तिथीनुसार शिवजयंती असून किल्ले शिवनेरीवर डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट झाली. यावेळी कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या पाया पडत त्यांना नमस्कार केला.
दोघांची गळाभेट : गेल्या काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार कोण अशी चर्चा सुरू होती. अखेर आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून लवकरच त्यांची उमेदवारी निश्चित असून फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यात एकमेकांवर टीका टिप्पणी केली जाते. आता देखील पक्षप्रवेशावेळी आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज मात्र दोघांचीही भेट झाल्यावर कोल्हे यांनी थेट आढळरावांच्या पाया पडत गळाभेट घेतली.
वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणं ही संस्कृती : यानंतर बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते. आज शिवजयंती असून किल्ले शिवनेरीवर दर्शनासाठी आलो आहे. वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणं ही संस्कृती आहे. म्हणून मी आढळराव पाटील यांना नमस्कार केला. आपण ही संस्कृती जपली पाहिजे. तसंच लढण्यासाठी ताकद द्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितलंय."
शिवनेरीवरुन प्रचाराची सुरुवात : शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, अनेक वर्षापासून तारखेनुसार आणि तिथीनुसार शिवजयंतीला मी शिवनेरीवर येण्याचा प्रयत्न करत असतो. मी आज शिवनेरीच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन माझ्या प्रचाराची सुरुवात केलीय. या पुढचं आयुष्य माझं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतीमालाला बाजारभाव मिळण्यासाठी त्याचप्रमाणं कांद्याला बाजार भाव आणि दुधाला बाजार भाव देण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. मी नौटंकी करत नाही, मी शेतकरी कुटुंबातील माणूस असल्यानं मला शेतकऱ्यांच्या वेदना माहिती आहेत. शेतकऱ्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये. त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या शेती मनाला बाजार भाव मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे. दीड वर्ष आम्ही मतदारसंघातील प्रश्न सोडवून घेतले आहेत मी कोणती नौटंकी केलेली नाही, मतदारसंघातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे.
हेही वाचा :