सांगली Sharad Pawar On Farmers : राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या शेती, पाणी, मोफत वीज योजनेवर जोरदार टीका केली. "फुकटचे निर्णय हिताचे नसतात, त्याचा गैरवापर होतो", अश्या शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सांगलीच्या कवठेएकंद येथे क्षारपड जमीन निर्मूलन कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन : शेती पाणी योजनेला मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळं आता फुकट वीज झाल्यावर मोटार बंद करायला कोण जाणार? असा सवाल उपस्थित केलाय. यामुळं पाणी जाऊन जाऊन त्यांच्या बापजाद्यांची असणारी जमीन क्षारपड होईल. यामुळं त्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करायचं नसेल तर फुकटाचे निर्णय हिताचे नसतात, त्याचा गैरवापर होत असतो. त्याचा गैरवापर न करणे याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी असं आवाहन, शरद पवारांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं.
शरद पवारांच्या हस्ते दिले निवेदन : माजी कृषी मंत्री शरद पवारांच्या उपस्थिती तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे क्षारपड जमीन समस्या बाबतीत संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकऱ्यांनी क्षारपड जमीन बाबत गाऱ्हाने मांडले. याबाबतचं निवेदन पुणे विभाग जलसंपदा संशोधन विभागाच्या अभियंता लांजेकर यांना शरद पवारांच्या हस्ते देण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील, युवा नेते रोहित पाटील आणि शेतकरी हजर होते.
शेतकऱ्यांना केलं मार्गदर्शन : यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, दुष्काळाबाबतीत आपण विचार केला पाहिजे. पाण्याचा वापर करताना विचार झाला पाहिजे. 3 वर्ष ऊसाची लागण केली त्याचे दुष्परिणाम आज भोगत आहे. जमीन घेण्याबरोबर अंडर ग्राउंड पाईपलाईन करण्यात 4 वर्षे गेली. ज्या क्षेत्रात माझे 20 टक्के उत्पादन होते. आज 65 टक्क्यांवर गेले, पण बागेचा निचरा केला पाहिजे याकडं लक्ष दिलं पाहिजे.
मी बोललो की अनेकांना राग येतो, उसाचे पीक माझ्या मते आळशी पीक. तसेच कट्ट्यावर बसून आपण जगाचे राजकारण करतो. पण आमच्या जमिनीचे काय होणार याचा विचार करत नाही. राजकारण करायचं असतं पण कायमचं नाही, घर शेती सांभाळून केलं पाहिजे. - शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
पाण्याचा अतिवापर टाळा : शेतीसाठी पाणी गरजेचे आहे. पण पाण्याचा अतिवापर होऊ नये, जमिनी क्षारपड होऊ नये. याची भविष्यात काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्यामुळं पाण्याचा अतिवापर न करणं याची शपथ घेतली पाहिजे. तरंच पुढची पिढी टिकेल, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा -