पुणे Sharad Pawar News : आज (3 फेब्रुवारी) पुण्यात बोलत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (शरद पवार गट) यांनी 'इंडिया' आघाडीतल्या फुटीवर भाष्य केलं. 'इंडिया' आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर पडल्या आहेत. मात्र निवडणुका झाल्यानंतर त्या 'इंडिया' आघाडीसोबत असणार आहेत. त्यांच्या राज्यातील काही अडचणींमुळं त्या आता जरी नसल्या तरी निवडणुका झाल्यानंतर त्या एकत्र येतील", असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीसोबत 'वंचित'ला घेण्याची प्रक्रिया सुरू : पुढं ते म्हणाले की, "राज्यात महाविकास आघाडीसोबत 'वंचित'ला घेण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याबद्दल झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. याविषयी बोलताना 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही मतं व्यक्त केली. ती योग्यच आहेत. फक्त केवळ निवडणुका जिंकण्यासाठी एकत्र येत आहोत का? की काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कुठला आणि कसा राहावा याविषयी बैठकीत चर्चा झाली. त्यांनी दिलेल्या सूचनांची देखील दखल घेतली जात असून त्यांच्या सूचना योग्य आहेत." तसंच यासंदर्भात अजून एक बैठक होणार असल्याचंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
अडवाणींना दिल्या शुभेच्छा : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर करण्यात आलाय. यावर प्रतिक्रिया देत शरद पवार म्हणाले की, "'भारतरत्न' जाहीर झालेली कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण आडवाणी ही दोन्ही नावं अतिशय योग्य आहेत. अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्ष होते. भाजपाचे नेता, संसदेचे सदस्य, मंत्री म्हणून त्यांनी आदर्श काम केलंय. रथयात्रेचा अपवाद सोडला तर आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणे केलंय. त्यामुळं त्या दोघांनाही माझ्या शुभेच्छा."
सत्तेचा गैरवापर केला जातोय : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवर नाराजी व्यक्त करत शरद पवार म्हणाले की, "सत्तेचा गैरवापर वापर केला जात आहे. सरकारची बघ्याची भूमिका असेल तर राज्य कोणत्या दिशेला जातंय याचा विचार करणं गरजेचं आहे. अशा गोष्टी चिंताजनक आहे."
हेही वाचा -