पुणे - Sharad Pawar News : देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालं आहेत. असं असताना एनडीएचे काही खासदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "असं काही माझ्या ऐकण्यात नाही. कुणी आमच्याशी बोलले नाही. संसदेचे अधिवेशन खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होत आहे. दुसऱ्या अधिवेशनापर्यंत हा सगळा अंदाज येईल. कुठल्याही खासदाराला पुन्हा निवडणूक नकोय. निवडणुका कव्हर करायला किती त्रास होतो? तेवढाच उन्ह पावसाचादेखील त्रास आम्हाला होतो. त्यामुळे आता स्पष्ट सांगायच झाल तर कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको आहे, असे यावेळी पवार यांनी सांगितलं.
शरद पवार यांची पुण्यात सभा : आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत आमचं एकच लक्ष्य आहे. अर्जुनाला जसा डोळा दिसत होता, तशी आमच्यासाठी उद्याची महाराष्ट्राची निवडणूक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे असे आम्ही एकत्र लढणार आहोत. तसेच जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल. आमच्या हातात तीन महिने आहे. विविध पक्षातील नेते आज भेट घेऊन पक्षात प्रवेश करत आहे." त्यांनी पुढं सांगितलं की, "महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं, असं अनेक आमदारांना आणि सगळ्यांना वाटतं आहे. आधी जे काही निर्णय आपण घेतले ते हिताचे नव्हते. आता काही लोक पक्षात यायला लागले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत."
टी -20 विश्वचषक : शनिवारी झालेल्या टी- 20 विश्वकप स्पर्धेत भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेतेपद मिळवलं आहे. याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हटलं, "एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघानं आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे. टी -20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. भारतीय टीमनं अद्भुत प्रकारचा चमत्कार केला आहे. सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे, अशी स्थिती होती. जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली कामगिरी केली आहे. आता टी -20 विजयामुळे दुष्काळातून भारताची मुक्तता झाली आहे. राहुल द्रविडनं खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केलं. भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो."
रोहित शर्मा विराट कोहलीची निवृत्ती : रोहित शर्मा विराट कोहली यांनी टी - 20 मधून निवृत्ती घेतली आहे. याबाबत पवार यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं, "टी- 20मधून निवृत्त होत आहेत. दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू असून फॉर्ममध्ये असतानाच निवृत्त घेणं योग्य असतं. दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान खूप मोठं आहे. नव्याना संधी मिळावी. माझ्या मते त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित केले. या दोघांचा निर्णय बरोबर आहे, मी त्यांचा अभिनंदन करतो."
- शरद पवार वारीत चालणार? : तुम्ही वारीत चालणार असल्याची चर्चा आहे, याबाबत पवार यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, "ही बातमी खोटी आहे. पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी एक दिवस मी स्वागतासाठी थांबणार आहे. वारकऱ्यांबरोबर मी चालणार नाही. मी फक्त त्याच्या स्वागतसाठी थांबणार आहे."
पिंपरी चिंचवडमधील 16 नगरसेवक : पिंपरी चिंचवड येथील अजित पवार यांच्या पक्षातील 16 नगरसेवकांनी भेट घेतली आहे. याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "नवीन लोकं जे पक्षात येणार आहे. त्यांना भेटण्यासाठी हल्ली मला रोज दोन तीन तास काढावी लागते. काही नगरसेवकांनी आमची भेट घेतली आहे. आम्ही येणाऱ्याचे स्वागत करतो. नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न राहील."
- राज्याचा अर्थसंकल्प : राज्य सरकारनं जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "तुमच्याकडे खिशात काय आहे हे न तपासता बाजारात गेला तर काय होते. लोकसभेच्या निवडणुकात महाराष्ट्रानं, जो निकाल दिला त्यामुळे धक्का लागला आहे. थोड्याच दिवसात वस्तुस्थिती काय आहे हे कळेल."
हेही वाचा :