शिर्डी : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सध्या विविध मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. तर विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा झंझावात पाहायला मिळतोय. आज शिर्डी विधानसभेत कॉंग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या दहशतीवर जोरदार हल्लाबोल केलाय. "ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी", धडा शिकवण्याची वेळ येऊ देवू नका, असा इशारा शरद पवार यांनी विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात दिलाय.
थोरातांना दिली कौतुकाची थाप : "उभं करायला अक्कल लागते उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही". या ठिकाणीची उद्ध्वस्त करणारी टोळी असून या टोळीचा या निवडणुकीत बंदोबस्त करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या कृषी मंत्र्यांत बाळासाहेब थोरात एक नंबर होते. आज आम्ही विचार करतोय की, यांच्या हातात उद्या तुम्ही लोकांनी राज्य दिलं तर नवीन योजना आणि कृषीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील, असं म्हणत पवारांनी बाळासाहेब थोरात यांना कौतुकाची थाप दिली.
...तर आमच्या कॉलेजचं काय होणार? : हिंजेवाडीच्या धर्तीवर नगरमध्ये गोरगरीबांच्या मुलांसाठी नॉलेज सिटी उभारण्याचा प्रस्ताव आपण ठेवला होता. त्यात सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाणार होते. त्यासाठी शेती महामंडळाची जमिनही दिली जाणार होती. पण त्यावेळी त्यात कोणी तरी खोडा घातला असा आरोपही पवारांनी विखेंचं नाव न घेता केला. जर इथं नॉलेज सिटी झाली तर आमच्या कॉलेजचं काय होणार याची चिंता त्यांना होती. जर गोरगरिबांच्या मुलांना तिथं शिक्षण मिळायला लागलं तर आमच्याकडं कोण येणार याची जास्त काळजी त्यांना होती. त्यामुळं या लोकांनी खोडा घातला, असा आरोप शरद पवार यांनी केला.
हेही वाचा -