ठाणे Thane Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची जागा असलेल्या ठाण्यासाठी भाजपाचे केंद्रीय पदाधिकारी ठाणे मोहिमेवर येणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष आणि सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे ठाण्याच्या मोहिमेची जबाबदारी भाजपानं टाकलीय. त्यामुळं 'ठाणे' महायुतीच्या खात्यात येण्यासाठी भाजपाकडुन सर्वतोपरी तयारी करण्यात येत असल्याचं समजतं. भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात शनिवारी बी. एल. संतोष यांच्यामार्फत ठाण्याच्या जागेचा आढावा घेण्यात आला असुन काही दिवसांत विनोद तावडे हे देखील ठाण्याची कमान संभाळणार आहेत.
भाजपाचे मोठे नेते ठाण्यात येणार : ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेसेनेच्या पदरात पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इथून ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केलीय. उमेदवारी जाहिर करण्यास विलंब झाल्यानं विरोधी उमेदवाराच्या तुलनेत महायुतीचा प्रचार अद्याप पहिल्या टप्पात आहे. आता मतदानासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असताना भाजपाच्या गोटात अजूनही कुरबुरी सुरु असल्याचं चित्र आहे. ही जागा शिंदेसेनेला सुटल्यामुळं नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ही नाराजी दूर झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रचाराच्या पातळीवर अद्यापही कार्यकर्ते सक्रिय झाल्याचं दिसत नाही. या पार्श्वभूमीवर ठाणे येथील भाजपाच्या विभागीय कार्यालयात शनिवारी बी. एल. संतोष यांनी बैठक घेतली. तसंच ठाणे लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी आणि कोअर समितीतील सदस्यांशी चर्चा करुन आढावा घेतला. त्याचबरोबर येत्या 15 मे रोजी विनोद तावडे हे ठाण्यात येणार आहेत. ते सुद्धा भाजपाच्या विभागीय कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
पंतप्रधान मोदींची सभा होणार : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार संजय केळकर आणि भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले हे प्रचारात सहभागी झाले असले तरी अद्याप शिवसेना-भाजपा आणि घटकपक्षांचा एकत्रित प्रचार दिसून येत नाही. भाजपाचे माजी शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांच्या नियोजनाची जबाबदारी असल्यानं तसंच कोंकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानं त्यांना या प्रचारात तितकासा सहभाग दर्शवता आलेला नाही. त्यामुळंच भाजपाच्या शिर्षस्थ नेतृत्वानं केंद्रीय नेत्यांना ठाणे मोहिमेवर धाडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा :