मुंबई Sanjay Raut Speech Mumbai : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा 58 वा वर्धापन दिन सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टोलेबाजी केली. "मोदी हा अगोदर एक 'ब्रँड' होता, पण आता त्याची 'ब्रँडी' झालीय," अशी जहरी टीकाही त्यांनी केली.
काय म्हणाले संजय राऊत? : यावेळी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे देशाच्या राजकारणातील हिरो आहेत. शिवसेनेनं फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेतलीय. महाराष्ट्र फडतूस माणसासमोर झुकणार नाही, हे आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलंय. मोदी-शहांना शिवसेना संपवायची होती. पण त्यांनी कितीही अघोरी कृत्य केलं तरी शिवसेना संपणार नाही. भाजपाचा पराभव झालाय आणि हे आभार यात्रा काढायला निघालेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, अशी बोचरी टीका राऊतांनी केली.
ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला : "उद्धव ठाकरेंनी मोदींचा महाराष्ट्रात पार खुळखुळा केला," असं म्हणत राऊतांनी राज्यात मिळालेल्या यशावर भाष्य केलं. "शिवसेना असंख्य हुतात्मांच्या बलिदानातून स्थापन झाली. त्यामुळं गुजरातचे सोमेगोमे तिला संपवू शकत नाहीत," असा इशाराही त्यांनी दिला. नकली हिंदुत्ववादी मोदींनी प्रभू रामापेक्षा स्वतःचे फोटो मोठे केले. परंतु, प्रभू रामानं लाथ मारल्यानंतर त्यांना राम दिसले. तसंच राज्यात भाजपाच्या बेईमानीचा स्ट्राईक रेट वाढला," अशी टीकाही राऊतांनी केली.
भाजपा 120 वर अडकला : पुढं ते म्हणाले की, "हा भाजपाचा शेवटचा आकडा आहे. यानंतर महाराष्ट्रात आकडा लागणार नाही. हा शेअर बाजार तात्पुरता असतो. दिल्लीत आणि महाराष्ट्रात तो कोसळणार आहे. भाजपानं 110 जागा 500 ते 1000 च्या फरकानं जिंकल्यात. मात्र, तो विजय मानता येणार नाही. जसा अमोल कीर्तिकर यांचा विजय चोरला तसं हा विजय चोरला. भाजपा 120 वर अडकलाय," असंही राऊत म्हणाले.
हेही वाचा -
- छगन भुजबळ आणि शिवसेनेत कुठलाही राजकीय संवाद नाही - संजय राऊत - Chhagan Bhujbal and Shiv Sena
- ''शिवसेना फोडणं हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठं आक्रमण..'' राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल - Sanjay Raut
- "उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी"; नारायण राणेंच्या विजयावरून राणे व ठाकरे गटात जुंपली - Nitesh Rane On Uddhav Thackeray