छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sanjay Raut On Devendra Fadnavis : लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं मोठा निर्णय घेतलाय. पक्षाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपा उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेत. रविवारी झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. तर या मुद्द्यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केलीय.
काय म्हणाले संजय राऊत : यासंदर्भात आज (13 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊत म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना देण्यात येणार असून त्यांच्याकडं हा अधिकार असणं महाविकास आघाडीसाठी शुभसंकेत आहेत. मोदी आणि शाह यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्यात. ज्यामुळं आमच्या किमान 25 जागा अजून वाढतील." तसंच राज्यात ठाकरे 2 सरकार अस्तित्वात येईल. लोकांच्या मनातील चेहरा मी सांगितला. काँग्रेस आणि नाना पटोले यांच्याकडं दुसरा चेहरा असेल तर त्यांनी सांगावा. निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, असं मत देखील संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केलं.
लाडक्या बहिणी लाचार नाहीत : पुढं ते म्हणाले, "रवी राणा म्हणतात निवडणुकीत पराभव झाला तर पैसे परत घेऊ. लाडकी बहीण ही योजना बहिणींसाठी नाही तर मतदानासाठी आहे. पैसे सरकारचे आहेत तुम्ही परत घेणारे कोण? या आमदाराची पत्नी लोकसभेत पडली, आता हे पण पडणार आहेत. त्यांची मानसिकता खराब आहे. मतदान केलं नाही तर पैसे परत घेऊ, पैसे काय तुमच्या घरचे आहेत का? अजित पवार यांच्या लाडक्या बहिणी त्यांचा बारामतीत पराभव करतील. कारण, या लाडक्या बहिणी लाचार नाहीत. आमचं सरकार आल्यास आम्ही त्यात पैसे वाढवू", असं आश्वासनही त्यांनी दिलं.
आम्हाला सर्वेक्षणाची गरज नाही : न्यायालयात तारखा घेऊन घटनाबाह्य सरकार चालवलं जातय. लोकसभेला मोदी आणि शाह यांच्या सभा घेता याव्यात म्हणून तारखा आपल्यानुसार घेण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत केलेलं सर्वेक्षण त्यांना प्रतिकूल नव्हतं आणि आजही नाही. आम्हाला या सर्वेक्षणाची गरज नाही. मात्र, आता निवडणुका वेळेवर घ्या आणि निकाल पण वेळेवर लावा, अशी मागणी देखील संजय राऊतांनी यावेळी केली.
हेही वाचा -