मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणूकनंतर पहिल्यांदा नागपूर दौऱ्यावर येतं आहेत. ते कळमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच पुतळ्याचा अनावरण करण्याची स्थानिकांची इच्छा होती, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण- खासदार संजय राऊत म्हणाले " शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते कळमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. पक्ष निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. कळमेश्वर येथील पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हातून करण्याबाबतचा प्रस्ताव स्थानिकांनी नाकारला. मालवणच्या दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पहिलं अनावरण आहे," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला आहे. निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.
महाराष्ट्र हळूहळू अदाणींचा करण्याचा घाट- "छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हळूहळू अदाणींचा करण्याचा घाट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करित आहेत. महाराष्ट्र छत्रपतींच्या नावानं ओळखला जातो. चांद्यापासून बांद्यापर्यंत यातल्या चांदा म्हणजे चंद्रपूर तेथून महाराष्ट्र अदाणीच्या घशात घालण्यास सुरुवात झाली. तो बांद्यापर्यत येणार आहे," असा आरोपदेखील राऊत यांनी केला आहे.
विदर्भात 100 ठिकाणी अदानीचे बोर्ड- पुढे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते राऊत म्हणाले, " धारावीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. विदर्भात 100 ठिकाणी जमिनीवर अदानीचे जमिनीवर बोर्ड लागले आहे. शाळा कॉलेज, महत्त्वाच्या वास्तू अदानीला देण्याचा आणि चंद्रपूरमधील शाळा अदानीला देण्याबाबत भाजपाची भूमिका काय? उद्धव ठाकरे असेपर्यंत अदानींचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. देशाचे पंतप्रधान मोदी हे अदानीसाठी काम करतात, हे राज्यात दिसू लागलं आहे. अदानींचे एजंट इतर राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे महाराष्ट्रातीलही लूट त्यांना दिसत नाही".
संजय राऊत यांनी साधला सरकारवर निशाणा - "महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही, याविषयी चिंता वाढू लागली आहे. लाडक्या बहिणी योजनेमुळे होमगार्ड असो किंवा पोलीस कर्मचारी यांना भविष्यात पगार होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्व निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला आहे. लाडकी बहीण योजनेचा श्रेय घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारी डेटा वापरून संपूर्ण बहिणींना पत्र पाठवित आहेत. तिसऱ्या किंवा चौथ्या हप्त्यानंतर लाडक्या बहिणी योजनेचा कोणताही हप्ता जाणार नसल्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे," असा दावा राऊत यांनी केला. सदर योजना ही भ्रष्टाचारी योजना आहे. राज्यातील अर्थ खाते अस्तित्वात असून तिजोरीत खडखडाट आहे, असा दावादेखील राऊत यांनी केला.
ईडीला पैसे जमा करण्याचे लक्ष्य- खासदार संजय राऊत -"ईडी संस्था भारतीय जनता पक्षाची कलेक्शन एजंट आहे. भाजपाच्या खात्यात ईडीच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. कोर्टाच्या आदेशानं कायदेशीरपणे पैसा जमा केला म्हणून निर्मला सीतारमण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ईडीला पैसे जमा करण्याचं लक्ष्य दिल जाते. आमच्या बाबतीत तसेच घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आमचं सरकार येऊ द्या, आम्ही सर्वांचा हिशोब करणार आहोत, असा राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. "निवडणूक आयोगानं सरकारसोबत असलेले लोकांविषयी आपली भूमिका स्पष्ट केल्यास मेहरबानी होईल," असा टोलादेखील राऊत यांनी लगावला.
गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा-दसरा मेळावा संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, " एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा अहमदाबाद येथून घ्यायला पाहिजे. कारण त्यांचा पक्ष गुजरातहून चालतो. महाराष्ट्रात दसरा मेळावा घ्यायचा त्यांना नैतिक अधिकार नाही. गुजरातमधील सर्वात मोठ्या मैदानात त्यांनी दसरा मेळावा घ्यावा. त्यासाठी प्रवक्ता म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहा आणि अदानी यांना निमंत्रित करावं. शिंदे गटाचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी काही घेणं देणं नाही. धर्मवीर चित्रपट त्यांनी गुजरातमध्ये काढायला हवा. अशा प्रकारचे चित्रपट महाराष्ट्र स्वीकारत नाही." दसरा मेळाव्यात महाराष्ट्राला अक्कल शिकवू नये. तसेच आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे दलाल आहोत, अमित शाहा आणि मोदींचे दलाल नाही, असा टोला संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांना लगावला आहे.
हेही वाचा-