मुंबई Sanjay Raut On CM : जमीन घोटाळ्यात अटक झालेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात हेमंत सोरेन यांना रांची उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. तर दुसरीकडं केंद्रीय तपास यंत्रणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील अटक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहे. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा रविवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी श्रीकांत शिंदे यांचा एका कुख्यांत गुंडासोबतचा फोटो ठाकरे गटाने प्रसिद्ध केला. या सर्व विषयांवर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाला एकच कायदा माहीत आहे : मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या फ्लोअर टेस्टसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली. सोरेन यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंग आणि जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. याआधी देखील याच कायद्याअंतर्गत अनेक नेत्यांना ईडीने अटक केली आहे. संजय राऊत यांना देखील याच कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. यासंदर्भात दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "सध्या या देशात एकच कायदा आहे आणि भाजपाला एकच कायदा ठाऊक आहे, तो म्हणजे PMLA. त्याचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात टाकत आहेत. त्यासाठी या कायद्याचा गैरवापर करत आहेत."
कायद्याचा गैरवापर होत आहे : हेमंत सोरेन यांना पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात टाकलं आहे. केजरीवाल यांना देखील त्याचं कायद्याने अटक करण्याचा या सरकारचा घाट आहे. राज्यात मी, अनिल देशमुख, नवाब मलिक यांना देखील पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती. गुन्हेगारी स्वरूपात कोणी पैसे घेतले तर त्यांना अटक झाली पाहिजे. आमदार गणपत गायकवाड यांचं स्टेटमेंट आहे. 'माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.' त्याचा शोध ईडीने घेतला पाहिजे. तो पैसा त्यांनी स्वीकारला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी ईडीला पुरावा लागत नाही. स्टेटमेंट हाच पुरावा असतो. त्यामुळं या कायद्याचा गैरवापर होत आहे. आता मुलुंडचा उघडा नागडा पोपट काय करतोय? एकनाथ शिंदे यांच्याकडे हिशोब मागा, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय.
गुंडांवर मॉनिटर होत आहे : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "श्रीकांत शिंदे हे बाळराजे आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. गुंडगिरीला कोणाचा राजाश्रय आहे? एक आमदार पोलीस स्टेशनमधे गोळीबार करतात. एक उपमुख्यमंत्री आणि यांचे चिरंजीव गुंडाच्या घरी पुण्यात गेले आणि विचाराचे आदन प्रदान केले. रविवारी एकाचा फोटो आम्ही जाहीर केला. बाकी लवकरच करू. ते कोण आहेत त्याची माहिती पुणे पोलिसांनी द्यावी. मुख्यमंत्री कार्यालयातून या गुंडांवर मॉनिटर होत आहे. त्यासाठी पोलीस काम करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली आहेत का"
तो व्हिडिओ लवकरच बाहेर येईल : "माझ्याकडे शिंदे गटाच्या खासदारांचा एक व्हिडिओ आला आहे. सध्या ते वारंवार परदेशात जात आहेत. ते का जात आहेत? काय काम करतात तिकडे? याची सर्व माहिती त्या व्हिडिओत आहे. परदेशात जातानाचा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. शिंदे गँगचे चरित्र लवकरच समोर येईल. Wait and Watch सगळं बाहेर येईल." अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलीय.
हेही वाचा -