मुंबई Sanjay Raut : इलेक्टोरल बॉंडवरुन विरोधकांनी भारतीय जनता पक्षाला धारेवर धरलं असून याच्या सखोल चौकशीची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्याचबरोबर राज्यातील सध्याच्या घडामोडीवर त्यांनी भाष्य केलं, ते मुंबईत बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फादर ऑफ करप्शन : याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या कविता यांना मद्य घोटाळ्यात काल अटक केली. एका महिलेला अशा पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावर अटक करण्यात आलीय. त्या माजी खासदार आहेत. त्यांची चौकशी पूर्ण झालीय. परंतु त्यांना अटक केली. हे एक दबाव तंत्र आहे. हजारो कोटी रुपयांचा इलेक्टोरल बाँडचा घोटाळा समोर आलाय. काळा भ्रष्टाचाराचा पैसा, धंद्याच्या बदल्यात चंदा. ज्या कंपनीचा टर्न ओव्हर 150 कोटी आहे, ती कंपनी 300 कोटी निधी देते. शेकडो कोटी रुपये औषध कंपन्या व हॉस्पिटलनं भारतीय जनता पक्षाला दिले म्हणून औषधं महाग झाली. जुगार कंपन्या, ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे त्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले. हे पाहता खरंतर मनी लॉन्ड्रीगची केस भारतीय जनता पक्षावर व त्यांच्या अध्यक्षांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चालायला पाहिजे व त्यांना अटक केली पाहिजे." तसंच महात्मा गांधी फादर ऑफ नेशन तर पंतप्रधान नरेंद्र मोदी फादर ऑफ करप्शन आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केलीय.
सरकार बदलल्यावर सर्वांची चौकशी होणार : संजय राऊत पुढं म्हणाले की, "आम आदमी पक्षाचे 2 मंत्री तुरुंगात आहेत. आज कविता जेलमध्ये गेल्या. आमच्या लोकांना धमकावलं जातंय. काल राहुल गांधी यांनी सांगितलंय की, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या हप्तेबाजीला या केंद्रीय यंत्रणांनी मदत केली. ज्यांनी वसुली एजंट म्हणून काम केलं आहे. त्या सर्वांची चौकशी भाजपाचं सरकार गेल्यावर होईल. म्हणून ही भाजपाची शेवटची निवडणूक आहे." तसंच ज्या पद्धतीनं इलेक्टोरल बाँड घोटाळा समोर आला. त्यामुळं देशातील प्रत्येक गावातील सामान्य माणसापर्यंत मोदींचा मै खाऊंगा, हा मेसेज पोहोचलाय. म्हणून या भ्रष्टाचारी लोकांचं सरकार पुन्हा येणार नाही. अबकी बार ४०० पर नाही, तर भाजपा तडीपार असंही त्यांनी म्हटलंय.
अंबादास दानवे नाराज नाहीत : विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना उमेदवारी नाकारल्यामुळं ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत. काल त्यांची आमच्या सोबत बैठक झाली. अंबादास दानवे यांची इच्छा आहे, त्या मतदारसंघात लढण्याची. परंतु इच्छा व्यक्त करणे काही गैर नाही आहे. याबाबत आमची सविस्तर चर्चा झाली आहे, ते कुठेही जाणार नाहीत ते आमच्या सोबतच आहेत."
प्रकाश आंबेडकरांना चार जागा दिल्या : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी ज्या 27 जागांची यादी आम्हाला दिली होती. त्यातील चार जागांचा प्रस्ताव आम्ही वंचित बहुजन आघाडीला दिलाय. आता त्या 4 जागा त्यांना मान्य आहेत की आणखीन आम्ही त्यांना काही देऊ शकतो, याबाबत आमचे दरवाजे उघडे आहेत. उद्या 'इंडिया' आघाडीची रॅली मुंबईत होणार आहे. सर्व मोठे नेते एकत्र येणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :