सांगली Sangli Congress : सांगली लोकसभेच्या आखाड्यात उमेदवारीचा निर्माण झालेला तिढा अखेर सुटलाय. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाट्याला सांगलीची जागा गेलीय. त्यामुळं या ठिकाणी आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर झालंय. मात्र या उमेदवारीवर जिल्ह्यातील काँग्रेस नेते मात्र नाराज आहेत. विश्वजीत कदम, विशाल पाटील आणि काँग्रेसनं सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळवण्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न केले होते. मात्र ते निष्फळ ठरले आहेत.
जागावाटपात शिवसेनेच्या वाटेला सांगली : महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सांगलीचा तिढा कायम होता. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र सांगलीची जागा आजवर काँग्रेसची राहिली आहे. त्यामुळं काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेसकडून अथक प्रयत्न करण्यात आले होते. विश्वजीत कदम यांनी याबाबत पुढाकार घेत विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त करत दिल्लीपर्यंत धडक दिली होती. महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल, असा दावा केला होता. त्यामुळं महाविकास आघाडीतही शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तीन दिवसाच्या सांगली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात संजय राऊतांनी जिल्ह्यातल्या काँग्रेससह राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर नौटंकी बंद करा, अशी टीका केली होती. सांगलीची जागा कोल्हापूरच्या बदल्यात मिळाल्याचं सांगत चंद्रहार पाटलांची उमेदवारी हीच महाविकास आघाडीची उमेदवारी असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं.
कॉंग्रेसचा जागेसाठी अट्टाहास : काँग्रेसकडून सांगलीची जागा मिळावी यासाठी विश्वजीत कदम, विशाल पाटील, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी मुंबई, दिल्ली, नागपूर अशा वाऱ्यादेखील केल्या. वरिष्ठांकडे सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे असा आग्रहदेखील धरला. मात्र आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचं स्पष्ट झालं. चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यावर शिक्कामोर्तब झालंय.
कॉंग्रेसलाच जागा मिळावी : महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर जिल्ह्यातल्या काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर एकत्रित येत महाविकास आघाडीच्या निर्णया विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यावर अन्याय करण्यात आल्याची भावना यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर 16 वेळा काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलाय. त्यामुळं याचादेखील काँग्रेसनं विचार करावा आणि सांगलीच्या जागेबाबत पुन्हा चर्चा करुन ती काँग्रेसलाच मिळावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.
आज होणार निर्णायक बैठक : महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत आणि पुढील भूमिकेबाबत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक सांगलीत पार पडणार असल्याचं शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केलंय. पृथ्वीराज पाटील म्हणाले," सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे. मात्र आता ती जागा शिवसेनेला मिळाली आहे. महाविकास आघाडीचा निर्णय हा अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. जन माणसाच्या विरोधातला हा निर्णय आहे. मात्र हा निर्णय अंतिम नसून स्वल्पविराम ठरू शकतो. त्यामुळं शिवसेनेनं पुन्हा विचार करुन सांगलीची जागा सोडावी. निर्णयाविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये देखील संतापाची भावना आहे. नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत विश्वजीत कदम, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, आमदार विक्रम सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. कार्यकर्त्यांश देखील चर्चा केली जाईल. अंतिम निर्णय हा विशाल पाटलांनी घ्यायचा आहे. त्यांच्या निर्णयानंतरच त्याबाबतची भूमिका घेतली जाईल," असं पृथ्वीराज पाटीलांनी यावेळी स्पष्ट केलंय.
सोशल मीडियात अनेक पोस्ट : लोकसभेची सांगलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर सांगली काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरच सांगली काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केलाय. सांगली काँग्रेसचं म्हणणं चुकलं का ? असं सवाल, पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलाय. सोशल मीडियाच्या काँग्रेस फॉर सांगली या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्या आशयाची पोस्ट करुन खंत व्यक्त केलीय. तर आता सांगलीच्या जागेचा उमेदवारीचा तिढा जरी सुटला असला, तरी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि स्थानिक काँग्रेस सांगली लोकसभा लढवण्याबाबत आजच्या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.
हेही वाचा :