मुंबई Jitendra Awhad : माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळं गुरुवारी आमदार आव्हाड ठाण्याकडं जात असताना तीन कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केलाय.
गाडी फोडण्याचा प्रयत्न : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेकडून झालेल्या हल्ल्यानंतर संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षापासून महाराष्ट्रात मला कोण हात लावू शकणार नाही. तसंच धमकी देऊ शकत नाही. मुस्लिम समाजाच्या मतांच्या लालसेपायी मुंब्राचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी स्वराज्य संघटनेचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी बेताल वक्तव्य केलं होतं. त्यासोबतच आरेरावीची भाषा देखील केली होती. आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना फटकवण्याचा आणि गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पळ काढला.
आव्हाड पळपुटे : युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे रक्त तपासावे लागेल ते छत्रपती घराण्यातील आहेत का? अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. महाराजांच्या घराबद्दल बेताल वक्तव्य करणारे जितेंद्र आव्हाड हे मर्द असते तर थांबले असते, ते पळपुटे आहेत हे सर्व महाराष्ट्राला आज कळलय. स्वराज्य संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं अंकुश कदम म्हणाले.
मी मुंबईकडून ठाण्याकडं जात असताना गाडीवर दगड पडल्याचा आवाज आला. गाडी थांबवायला सांगितली, त्यानंतर हा हल्ला झालाय. संभाजी राजेंची चूक होती. विशाळगडावर जे काही झालं, ते त्यांच्या आडून झालं. त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती. हे मी आज देखील सांगत आहे. - जितेंद्र आव्हाड, आमदार
उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक राजीनामा : आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण कधीही झालं नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अशा प्रकारे कधीही बिघडली नाही. राज्याच्या डी जी भाजपासाठी काम करत आहे. त्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांनी जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलीय.
हेही वाचा -
- प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले! आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हे शिर्डीत वर्ग करण्याचे न्यायालयाचे निर्देश - Jitendra Awhad News
- फुटलेल्या आमदारांना जोड्याने मारा; विधानपरिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया - Jitendra Awhad
- नागरी नक्षली विधेयक महाराष्ट्रासाठी घातक, हे विधेयक आम्ही मंजूर होऊ देणार नाही; जितेंद्र आव्हाड - urben nakshali bill