नागपूर Anil Deshmukh On Sachin Waze : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) त्यांच्या 'पीए'मार्फत पैसे घेत होते, असा धक्कादायक खुलासा सचिन वाझे यांनी केला. यासंदर्भात सीबीआयकडं सबळ पुरावे असून माझी नार्को चाचणी करण्यात यावी, असं देखील सचिन वाझे म्हणाले. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. "ही देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे. खुनातील आरोपी असलेले सचिन वाझे यांना हाताशी धरून फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) नवीन चाल खेळली आहे. मात्र, सचिन वाझेंवर विश्वास ठेवता येणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं," असं म्हणत अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची वस्तूस्थिती जनतेसमोर ठेवली होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी तीन वर्षापूर्वी फडणवीस यांनी शपथपत्र देण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता. ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली, त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी ही नवीन चाल खेळली आहे. - अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
सचिन वाझेंवर विश्वास ठेवता येणार नाही : सचिन वाझेंनी शुक्रवार केलेल्या आरोपांवर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, "कदाचित देवेंद्र फडणीस यांना माहिती नसेल की, मुंबई हाय कोर्टानं सचिन वाझे यांच्याबद्दल एक निरीक्षण नोंदवलं होतं. सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. दोन खुनांच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली असून, ते आता तुरुंगात आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी लक्षात घेता आता त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही."
सचिन वाझेंच्या माध्यमातून माझ्यावर आरोप : "गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेंना हाताशी धरून देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप करत आहेत. त्यामुळं जनतेला हे मी सांगू इच्छितो की, मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले म्हणून फडणवीस सचिन वाझेंच्या माध्यमातून माझ्यावर आरोप करत आहेत," असं म्हणत देशमुखांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले.
सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा : "ज्या वेळेस सचिन वाझे हे म्हणत आहेत की, माझी नार्को टेस्ट करा. त्यावेळेस वाझेंची नार्को टेस्ट करून खरं काय ते समोर आलंच पाहिजे," अशी मागणी भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी केली. "अनिल देशमुख कश्याला भीत आहेत. देशमुख हे आठवडाभरापासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळं लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, सचिन वाझेंची नार्को चाचणी केल्यानंतर 'दूध का दूध' आणि 'पाणी का पाणी' होऊन जाईल," असं आमदार फुके म्हणाले.
हेही वाचा -
- सचिन वाझेंच्या आरोपांनी भाजपाच्या हातात आयतं कोलीत; अनिल देशमुख खंडणी प्रकरणावरुन पुन्हा उडणार 'भडका' - Sachin Vaze vs Anil Deshmukh
- मला सोडा, सचिन वाझेची याचना; सीबीआय, तळोजा तुरुंग प्रशासनाला उच्च न्यायालयाची नोटीस - Sachin Vaze Petition
- सचिन वाझेला आणखी एक झटका, ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात न्यायालयानं फेटाळला माफीच्या साक्षीदाराचा अर्ज