मुंबई Parth Pawar Security : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना राज्य सरकारकडून वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आलीय. वाय प्लस सुरक्षेमध्ये 11 जवान, दोन ते चार सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ कमांडो आणि पोलिसांचा समावेश असतो. गृह विभागानं पार्थ पवार यांना 'वाय प्लस' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, पार्थ पवार आमदार, खासदार किंवा मंत्री नाहीत. त्यांना 'वाय प्लस' सुरक्षाची गरज काय? असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केलीय.
वाय कशाला झेड सुरक्षा द्या : पार्थ पवार यांना वाय कशाला झेड सुरक्षा दिली पाहिजे. तसंच दोन रणगाडेसुद्धा ठेवण्याची गरज आहे असा खोचक टोला, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या सुरक्षावरून लगावलाय. लोक भाजपाच्या विरोधात आहेत. त्यामुळं जे लोक भाजपासोबत आहेत त्यांना जनता अडचणीत आणू शकते, म्हणून ही सुरक्षा दिली असावी. तसंच हे सरकार कलाकारांना सुरक्षा देत आहे. आमदारांना सुरक्षा देत आहे आणि नेत्यांच्या मुलांना सुरक्षा देत आहे. या सरकारला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे काय पडले नाही. कोयता गँग वाढत आहे. दिवसाढवळ्या गोळीबार होत आहेत. महिलांवरील अत्याचार वाढता आहेत. गोरगरीब मरतात याकडं सरकारचं दुर्लक्ष आहे. मात्र, नेत्यांच्या मुलांना सुरक्षा पुरविली जात आहे. पण 'वाय प्लस' सेक्युरिटी कशाला? त्यांनी झेड सेक्युरिटी नेत्यांच्या मुलांना द्यावी, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी राज्य सरकारवर केली.
30-40 आमदारांना xxx विचारत नाही : शिंदे गटातील जे 30-40 आमदार आहेत त्यांना कोणी विचारत नाही. त्यांना सिक्युरिटी नाही. मात्र, पार्थ पवार यांना कोणत्या कारणामुळं सिक्युरिटी दिलेली आहे, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय. ज्यांना खरंच सुरक्षेची गरज आहे त्यांना दिली पाहिजे. त्याच्यात काही शंका नाही. मात्र, शौक म्हणून कोणालाही सेक्युरिटीची काही गरज नाही. पार्थ पवारांना जी सिक्युरिटी दिली आहे, ती काढली पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
बरं आहे आमच्या मुलांना नाही दिली : पार्थ पवार यांना 'वाय प्लस' सुरक्षा देण्यात आलीय, असं खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, बरं आहे आमच्या मुलांना सिक्युरिटी नाही दिली, असा टोला सुप्रिया सुळेंनी सरकारला लगावला. आपल्या मुला-मुलीवर प्रेम करणं हा काय गुन्हा नाही. जगातील सर्वच आई-वडील मुला-मुलीवर प्रेम करतात. पण मला विचाराल तर हे अगदीच बालीश आहे.
म्हणून हा निर्णय घेतला असावा : कोणाला कुठली सुरक्षा द्यायची, कोणाला वाय, कोणाला झेड सुरक्षा द्यायची हे गृह विभाग निर्णय घेत असतं. एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका आहे असं जर गृह विभागाच्या निदर्शनास आलं किंवा त्यांना पोलीस स्टेशनमधून तसा अहवाल प्राप्त झाला तर गृह विभाग त्या व्यक्तीच्या सुरक्षेत वाढ करते. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यानिमित्तानं पार्थ पवार यांना प्रचारासाठी फिरावं लागतय. त्यामुळं त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो किंवा त्यांना अधिक सुरक्षेची गरज आहे, असं गृह विभागाला वाटलं असावं, म्हणून या कारणामुळं गृह विभागानं त्यांना 'वाय प्लस' सुरक्षा पुरवली आहे, असं शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- "पराभवाच्या हताशेनं शिवीगाळ...", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Devendra Fadnavis
- अकोल्यात आज अमित शाह यांची सभा, काय आहेत लोकसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे? - Akola Lok Sabha election 2024
- पंतप्रधान मोदींच्या वादग्रस्त विधानावरुन काँग्रेस आक्रमक; म्हणाले, "संविधानाला भाजपाचा..." - PM Narendra Modi