पुणे Ravindra Dhangekar : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलीय. शरद पवार यांचं मार्गदर्शन आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे काम करायचं? याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी भेट घेतल्याचं आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले.
त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडे वस्ताद : महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे हजार पैलवान प्रचारात उतरुन त्यांचा प्रचार करणार आहेत. तुमच्याकडे कोण आहे, असा प्रश्न रवींद्र धंगेकर यांना विचारला असता आमदार धंगेर म्हणाले, " त्यांच्याकडे पैलवान आहेत. तर आमच्याकडे वस्ताद आहेत. खरंतर पहिलवान हा समाजासाठी संरक्षण करणारा घटक आहे. मुरलीधर मोहोळ यांनी गरीब पैलवानांना कधी दूध पाजलं नाही. त्यांनी मोठ्या बिल्डर आणि उद्योजक लोकांना दूध पाजून पैलवान केलंय. पैलवान हा समाजाचं रक्षण करणारा असतो. त्यांना चांगलं-वाईट कळतं. आमच्याकडे सुद्धा पैलवानांना घडवणारे वस्ताद आहेत," असे त्यांनी म्हटलंय.
शरद पवारांचं काम मोठं आहे. समाजकारण राजकारणात त्यांचा अनुभव आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला उपयोगी पडणार आहे. तसंच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यासाठी ही भेट घेतली-आमदार रवींद्र धंगेकर
दोन दिवसात आबा बागुल सगळ्यात पुढं माझा प्रचार करतील : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसअंतर्गत बंडखोरी किंवा नाराजी समोर येत आहे. काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी शनिवारी काँग्रेस भवनमध्येच आंदोलन केलं. यावर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, 'दोन दिवस थांबा. आबा बागुल सगळ्यात पुढं माझा प्रचार करताना तुम्हाला दिसतील. त्यांच्या भागातून काँग्रेसला सगळ्यात जास्त मत मिळेल. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांची भेट घेईल. आमचे सर्व नेते त्यांची भेट घेतील," असंही रवींद्र धंगेकर म्हणाले.
तीच बापट यांना श्रद्धांजली : भाजपाचे दिवगंत आमदार गिरीश बापट यांचा फोटो वापरल्यावरुन मोठा वाद निर्माण झालाय. त्यावर गिरीश बापटांचे पुत्र गौरव बापट यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले, " गौरव बापट यांची दिलेली प्रतिक्रिया ही त्यांना कुठून तरी पाठवलेली स्क्रिप्ट आहे. गिरीश बापट हयात असताना सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला? हे सर्वांना माहित आहे. कमीत कमी बापट कुटुंबाची दखल त्यांना घ्यावी लागली. हीच खरी गिरीश बापट यांना श्रद्धांजली आहे," असा आमदार धंगेकर यांनी भाजपाला टोला लगावला.
हेही वाचा :