पुणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असतानाच राज ठाकरे यांचा पक्ष आगामी निवडणुकीसाठी महायुतीत सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू होती. मात्र, असं असतानाच आता मनसे राज्यात स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये सहभागी न होता मनसे राज्यातील जवळपास 225 ते 250 जागा स्वबळावर लढवणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राची बैठक : सोमवारी (7 ऑक्टोबर) पुण्यातील संकल्प मंगल कार्यालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्राची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मनसे नेते शिरीष सावंत, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, बाबू वगासकर, सरचिटणीस बाळा शेडगे, किशोर शिंदे, अजय शिंदे आदी ग्रामीण आणि शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे काय म्हणाले? : या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना राज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनता सत्ताकेंद्रित राजकारण करण्याच्या युती आणि आघाडीच्या वृत्तीला कंटाळली आहे. राज्यातील जनतेला आता त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी मनसे हाच पर्याय वाटतोय. तुम्ही तो पर्याय आहात. ही लढाई जनता विरुद्ध आजचे आणि कालचे सत्ताधारी अशीच होणार आहे. त्यामुळं या लढाईला जिंकण्यासाठी तयार राहा आणि जनतेतील प्रश्न सोडविण्यावर भर द्या."
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वबळाचा नारा दिला गेलाय. तसंच निवडणुकीसाठी राज्यभर जोरदार तयारी करण्यात आली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तसे आदेशही देण्यात आलेत. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती तसंच महाविकास आघाडीबरोबर मनसेचे उमेदवार मैदानात पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा -