नवी दिल्ली Congress Criticized PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यापूर्वी निवडणूक प्रचारात अदानी आणि अंबानींची एन्ट्री झाल्याचं बघायला मिळतंय. आत्तापर्यंत आपण विरोधी पक्षांनाच अदानी आणि अंबानींचं नाव घेऊन टीका करतांना पाहिलंय. मात्र यंदा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं नाव घेत राहुल गांधींवर टीका केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. तेलंगणातील करीमनगर येथील प्रचारसभेत बोलत असताना मोदींनी अदानी, अंबानींवरून थेट राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. तसंच काँग्रेसनं अदानी, अंबानींकडून पैसा घेतल्याचा गंभीर आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला. यावरुनच आता काँग्रेसनं पलटवार केलाय.
काँग्रेसनं काय म्हटलंय? : "निवडणुकीच्या तीन टप्प्यांनंतर नरेंद्र मोदी इतके चिडलेत की ते आता अदानी आणि अंबानींच्या विरोधात बोलू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले- राहुल गांधी अदानी-अंबानींचं नाव घेत नाहीत. सत्य हे आहे की, 3 एप्रिलपासून आतापर्यंत राहुल गांधींनी 103 वेळा अदानी आणि 30 वेळा अंबानींचं नाव घेतलंय, असं स्पष्ट करत काँग्रेसनं मोदींवर पलटवार केलाय.
राहुल गांधींची टीका : यासंदर्भात राहुल गांधींनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला. त्यात म्हटले की, " मोदीजी थोडं घाबरले आहात का? कारण तुम्ही पहिल्यांदाच अदानी-अंबानींबद्दल जाहीरपणे बोललात. तुम्हाला माहित आहे की, ते टेम्पोमध्ये पैसे देतात, हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम करा, त्यांच्याकडं ईडी सीबीआय पाठवा. लवकरात लवकर पूर्ण माहिती मिळवा. तुम्ही घाबरू नका. मी देशाला पुन्हा पुन्हा सांगतोय की नरेंद्र मोदींनी जेवढा पैसा त्यांना दिलाय. तेवढाच पैसा आम्ही भारतातील गरीबांना देऊ."
मोदींची खुर्ची आता डळमळीत झालीय : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. खरगे यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "काळ बदलतोय. मित्र आता मित्र राहिले नाहीत. निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आज पंतप्रधान आपल्याच मित्रांवर टीका करत आहे. यावरून मोदींची खुर्ची डळमळीत झाल्याचं दिसून येतंय. हा निकालांचा खरा ट्रेंड आहे."
नेमकं काय म्हणाले होते नरेंद्र मोदी? : "लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताय काँग्रेसनं अंबानी-अदानींचं नाव घेणं का थांबवलं? काँग्रेसला निवडणुकीसाठी त्या उद्योगपतींकडून किती पैसे मिळालेत? गेल्या 5 वर्षांपासून काँग्रेसचे राजपुत्र सकाळी उठल्याबरोबर 'अंबानी', 'अदानी' यांच्या नावाची जपमाळ करायचे. पण निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी आणि अदानींवर टीका करणं बंद केलंय. मला काँग्रेसच्या राजपुत्राला विचारायचंय की, त्यांना अदानी आणि अंबानींकडून किती पैसे मिळालेत? त्यांनी काळ्या पैशांनी भरलेली किती पोती घेतली?", अशी टीका मोदींनी केली होती.
हेही वाचा -
- देशात 'इंडी' आघाडी सत्तेत आल्यास 'मिशन कॅन्सल', मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा प्लॅन - Narendra Modi Beed Sabha
- "कसाबची बाजू घेत काँग्रेस पाकिस्तानला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - PM Narendra Modi in Ahmednagar
- आजपासून प्रियंका गांधी घेणार अमेठी, रायबरेलीची सूत्रं हाती; दोन वॉररूममधून सुरू केलं काम - Lok Sabha Election 2024