कटक Rahul Gandhi Rally In Cuttack : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी (28 एप्रिल) ओडिशातील कटक येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, " ओडिशातील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचं सरकार केवळ निवडक लोकांसाठीच काम करते."
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी? : "बीजेडी आणि भाजपा एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत असले, तरी दोघंही एकत्रच आहेत," असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसंच ओडिशामध्ये भाजपा आणि बीजेडीत करार झाला आहे. व्हीके पांडियन हे राज्यात सरकार चालवित आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात नवीन पटनायक यांनी काही खास लोकांनाच फायदा करून दिला. मात्र, दोन्ही पक्षांविरुद्ध काँग्रेस लढत आहे," असंही ते म्हणाले.
पुढं ते म्हणाले की, "आज समाजातील विविध घटक त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार आल्यास शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या जातील. गेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणात काँग्रेसला पाठिंबा मिळाला होता. तेव्हा पाच हमीभाव देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी केली," असं राहुल गांधी यांनी सांगितलं. "मोदी सरकारमध्ये गेल्या 10 वर्षांत मोजक्याच लोकांना लाभ देण्यात आला. ओडिशात त्यांनी तुमचे पैसे लुटले. याला भागीदारी म्हणा किंवा लग्न म्हणा, बीजेडी आणि भाजपा दोन्ही एकत्र आहेत," असा दावाही त्यांनी यावेळी केला.
सभेत राहुल गांधींनी दिलेली महत्त्वाची आश्वासनं-
- 200 युनिट मोफत वीज
- महिलांना दरमहा 2,000 रु
- बेरोजगार युवकांना 3,000 रुपये मासिक भत्ता
- धान पिकासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३ हजार रुपये
- एलपीजी गॅस सिलिंडर 500 रुपयांना
काँग्रेस गरीब महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देण्याची हमी देत आहे. ओडिशातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी 'पहली नौकरी पक्की' योजना लागू केली जाईल. या योजनेत सर्व बेरोजगार तरुणांना हमी मिळेल. पक्षाची सत्ता आल्यास देशातील जमीन, पाणी आणि वनसंपत्तीवर काँग्रेस आदिवासींना हक्क देईल-काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी
कोण आहेत व्हीके पांडियन : माजी सनदी अधिकारी व्ही. के. पांडियन हे बीजेडी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या जवळचे मानले जातात. ओडिशा केडरचे 2000 बॅचचे आयएएस अधिकारी पांडियन हे काही वर्षे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी गेल्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यानंतर लगेचच त्यांना ओडिशा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या पांडियनचं पूर्ण नाव व्ही. कार्तिकेय पांडियन आहे. पांडियन यांनी त्यांच्या पहिल्या पोस्टिंगमध्ये सीएम पटनायक यांना चांगलंच प्रभावित केलं होतं.
हेही वाचा -
- केवळ 22 अरबपतींना नाही, तर कोट्यवधी लोकांना लखपती करणार; राहुल गांधी यांची घोषणा - Lok Sabha Election 2024
- अमरावतीसह सोलापुरात राहुल गांधींची तोफ धडाडणार; दोन्ही ठिकाणी तापणार राजकीय वातावरण - Rahul Gandhi Rally
- 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally