मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर (Vidhan Sabha Election) भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या विधानामुळं आता आगामी विधानसभा निवडणुकीत नवं राजकीय समीकरण निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वंचितला पाठींबा वाढत आहे : दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात वंचितला मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्याचप्रमाणं पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात आता वंचितला पाठींबा वाढत असल्याचा दावा, अँड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलाय. यांसदर्भात बोलताना ते म्हणाले की, आचारसंहिता असतानाही केंद्र शासनानं त्याचं उल्लंघन केलं आणि इथेनॉलवरील बंदी हटवली. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरायची परवानगी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण साखरेचं उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल तयार करण्याची परवानगी काही जणांनाच देण्यात आली होती. याचं राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय.
मुंबईतील जागा जाहीर करणार : मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत. सहाही जागांवर उमेदवार जाहीर करणार आहोत. काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे, पण त्यांच्या आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात म्हणावं लागेल की, 'बळीची बकरी' काँग्रेसकडून दिलेली आहे, असा टोला त्यांनी लगावला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उध्दव ठाकरे शिवसेना असं काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचं काम करत नाही. त्यामुळं धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडं वळला असल्याचा दावा त्यांनी केलाय.
भाजपा १७० जागांच्या आसपास : नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यामुळं लोकांनी आता धडा घ्यावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या, त्यावेळी याच चर्चेला सुरुवात झाली होती. नवीन सर्व्हेनुसार भाजपा कुठेही 200 पार करत आहे, असं दिसत नाही. फारतर भाजपा 170 जागांच्या आसपास राहिल, असं भाकित आंबेडकर यांनी केलंय.
समान नागरी कायदा लागू करून दाखवा : अमित शाह यांनी 'समान नागरी कायदा' लागू करणार असं वक्तव्य एका सभेत केलं होतं. यासंदर्भात बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, समान नागरी कायदा भाजपानं करूनच दाखवावा. भाजपा आणि आरएसएस स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल, असं मला वाटत नाही. तो संसदेचा कायदा आहे. संविधानात प्रत्येक धर्माला सुरक्षा दिलेली आहे.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणूक 2024 : अकोल्यात मतदानाला शांततेत सुरुवात; सकाळच्या सत्रात 7 टक्के मतदान - Lok Sabha Election 2024
- ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीत होणार तिरंगी लढत - Lok Sabha Elections 2024
- प्रकाश आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदार संघात एमआयएमचा पाठिंबा; असदुद्दीन ओवैसींचा मनोज जरांगेंना 'हा' सल्ला - Lok Sabha Election 2024