पुणे Prakash Ambedkar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज (12 फेब्रुवारी) पुण्यात भीमा कोरेगाव आयोगाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर : यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी अगोदर पासूनच सांगत होतो की निवडणुका जस-जसं जवळ येतील तस-तसं राजकारणात अनेक गोष्टी घडत जातील. भाजपाने कितीही प्रयत्न केले आणि कोणालाही फोडलं तरी महाराष्ट्रात ते यशस्वी होणार नाहीत. राज्यातील लोकांनी अशी मानसिकता तयार केली आहे. आपले राज्य कधीही वादग्रस्त नव्हते, यापूर्वी स्थिर सरकार चालत होतं. पण आता पक्षफुटी तसंच गोळीबाराच्या घटना घडत आहेत. हे सर्व पाहता लोकांनी ठरवलंय की कोणाला मतदान करायचं." तसंच 60 ते 75 टक्के लोकांनी आपलं मत अगोदरच तयार केलेलं आहे. त्यामुळं भाजपाला जे पाहिजे ते होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मविआवर काहीही परिणाम नाही : चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता आंबेडकर म्हणाले की, "एखादी व्यक्ती पक्ष सोडून गेली म्हणजे पक्षाला फार काही त्रास होतो असं नाही. नेता जातो पण पक्ष कायम असतो. त्यामुळं अशोकराव चव्हाण यांच्या राजीनाम्याला आपण धक्का मानू शकतो. पण पक्षाला याचा काहीही परिणाम होणार नाही", असं आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधान मोदी रिंग मास्टर : सध्या राजकीय वर्तुळात केंद्रीय तपास यंत्रणेमुळं चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतंय. याविषयी प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "या सर्व गोष्टींचे रिंग मास्टर पंतप्रधान मोदी आहेत. तसंच जे कोणी चौकशीमध्ये अडकलेलं असेल त्या सर्वांना मोदी नाचवणार आहेत."
हेही वाचा -