मुंबई Ashok Chavan : राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपाचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरण्याअगोदर मुंबईतील सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलंय. दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असताना त्यांची भेट अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल पटेल यांच्याशी झाली. या प्रसंगी दोघांनी एकमेकांचं अभिनंदन केलं असून, "हम पहले भी साथ मे थे लेकीन अब बहार आई" असं सूचक वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं.
बाप्पाच्या दर्शनाने नवीन इनिंग्जला सुरुवात : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दोनच दिवसापूर्वी भाजपावासी झालेले अशोक चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुंबईतील सिद्धिविनायक बापाचं दर्शन घेतलं होतं. दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणाले की, संजय राऊत यांनी केलेले आरोप खोटे आहेत. मी कधीही दगा फटका करणारा माणूस नाही. तसंच नामांकन पत्र दाखल करायच्या अगोदर सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घ्यावं आणि दर्शनानंतर नामांकन पत्र दाखल करावं यासाठी आज दर्शन घेतल्याचं चव्हाणांना म्हटलंय.
पहले भी साथ मे थे लेकीन अब बहार आई : अशोक चव्हाण हे सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडले असता, त्यांची भेट अजित पवार गटाचे राज्यसभेचे उमेदवार प्रफुल पटेल यांच्याशी झाली होती. याप्रसंगी दोघांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. विशेष म्हणजे या भेटीनंतर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, हम पहले भी साथ मे थे, लेकीन अब बहार आई है, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाल संपायला अद्याप चार वर्षापेक्षा अधिक कालावधी असताना, अजित पवार गटाकडून त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातय.
शेवटचा दिवस दुपारी ३ पर्यंत ची वेळ : आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून महाराष्ट्रातील ६ जागांसाठी ६ उमेदवार घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली असून अजित पवार गटातून प्रफुल पटेल तर एकनाथ शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज हे सर्व ६ उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. जर तोपर्यंत या ६ उमेदवारांव्यतिरिक्त इतर कोणी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होईल.
हेही वाचा -
- राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक; आमदारांना व्हीप
- राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, 'आयारामांचं' नशिब फळफळलं; अजित पवार गटाचे मात्र 'वेट अॅंड वॉच'
- प्रफुल्ल पटेल गिरवणार नितीश कुमारांचा कित्ता; खासदार होण्यासाठी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभा निवडणुकीचा भरणार अर्ज