मुंबई Praful Patel Nominated as Candidate : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केलाय. पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेच राज्यसभेचे उमेदवार असतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. विशेष म्हणजे, प्रफुल्ल पटेलांचा राज्यसभेचा बराच कार्यकाळ शिल्लक असताना पक्षाच्या या निर्णयानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
राज्यसभेचं गणित काय : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील तीन जागा भाजपला मिळणार असून शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. यातील तीन पक्षांनी यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळं अजित पवार गटाकडून कुणाला संधी दिली जाणार? याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते. आता अखेर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय.
तात्रिक बाबींचा विचार करुन उमेदवारी : "काही तांत्रिक बाबींचा विचार करत प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्याचा कोअर कमिटीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. ते विजयी झाल्यानंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल. ती जागा रिक्त झाल्यानंतर मे महिन्यामध्ये पोटनिवडणूक लागेल त्यावेळी इतर नावांचा विचार केला जाणार आहे", असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या पदासाठी पक्षातून अनेकजण इच्छूक होते. इतर कुणाला उमेदवारी देऊन, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको म्हणून हे सावध पाऊल टाकल्याचं बोललं जातंय. अजित पवार गटाकडून त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसंच नुकतेच कॉंग्रेसमधून पक्षात दाखल झालेले बाबा सिद्दीकी यांच्या नावाचीदेखील चर्चा होती. पण प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा संधी देण्यात आलीय.
- खासदार असताना पुन्हा उमेदवारी : खासदार प्रफुल पटेल हे 2022 मध्येच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. राज्यसभा खासदाराचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो. त्यांचा बराच कार्यकाळ अजून बाकी आहे. अशातच कालावधी संपवण्यापूर्वीच पटेल का निवडणूक लढवत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
सर्व सहा उमेदवार जाहीर : राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी महायुतीनं आपले सर्व 5 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपानं त्यांचे तीन उमेदवार जाहीर केले आहेत. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी खासदार मिलिंद देवरा, तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे उमेदवार असतील. तर काँग्रेसनंही चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलीय.
हेही वाचा :