अमरावती : विधानसभा निवडणुकीकरता अमरावती जिल्ह्यातील मातब्बर राजकीय मंडळींनी उमेदवारी अर्ज सादर करताना जोडलेल्या शपथपत्रात आपल्याकडं असणाऱ्या संपत्तीची माहिती दिली. शपथपत्रातील नोंदीनुसार अमरावती जिल्ह्यात रवी राणा, यशोमती ठाकूर, बच्चू कडू, प्रताप अडसड, बबलू देशमुख असे मातब्बर नेते नेमके किती श्रीमंत आहेत ते सार्वत्रिक झालं आहे.
रवी राणांकडं 7.80 कोटीची मालमत्ता : बडनेरा मतदारसंघात सलग तीनवेळा निवडून आलेले रवी राणा आता चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी जोडलेल्या शपथपत्रानुसार त्यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता ही 7.80 कोटी रुपयांची आहे. 2019 मध्ये जोडलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार त्यांच्या मालमत्तेत पाच वर्षात 6.20 कोटी रुपयांनी वाढ झाली. रवी राणा यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडं 19.70 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडं 11.97 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता होती. यामध्ये आता 7.73 कोटींनी वाढ झाली आहे. रवी राणा यांच्याकडं रोख तीन लाख 95 हजार 220 रुपये आहेत तर नवनीत राणा यांच्याकडं रोख चार लाख दहा हजार तीनशे पन्नास रुपये आहेत. रवी राणा यांच्याकडं 78 ग्रॅम सोनं आहे तर नवनीत राणा यांच्याजवळ ८४२ ग्रॅम सोनं असल्याचं शपथपत्रात नमूद आहे. नवनीत राणा यांच्याजवळ 55.37 लाख रुपयांची चार चाकी देखील आहे.
बच्चू कडूही कोट्यधीश : अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणारे बच्चू कडू यांची जंगम मालमत्ता 50.38 लाख तर स्थावर मालमत्ता 55.55 लाख रुपये इतकी आहे. 10.87 लाख रुपयांचे कर्ज असल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद केलं. बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडू यांच्या नावे 59.69 लाख रुपयांची जंगम तर 2.45 कोटीची स्थावर मालमत्ता आहे. 45 ग्रॅम सोनं आणि अर्धा किलो चांदी बच्चू कडू यांच्या जवळ असून त्यांच्या मालकीची 18 लाखांची चार चाकी आहे. बच्चू कडू यांच्या मुंबई स्थित एसबीआय खात्यात 2.31 लाख, बेलोराच्या बँक खात्यात 9.50 लाख रुपये जमा आहेत, तर प्रहार फूड लिमिटेड या कंपनीत चार लाख रुपयांचे शेअर्स देखील आहेत.
यशोमती ठाकूरांकडे चार कोटींची मालमत्ता : तिवसा विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधणाऱ्या यशोमती ठाकूर या चौथ्यांदा काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी दिलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार त्यांच्याकडं चार कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय 400 ग्रॅम सोनं आणि वीस हजार रुपये रोख आहेत. वारसा हक्काने प्राप्त 8.75 कोटी रुपयांच्या मालमत्तेपैकी त्यांच्या नावे एक तृतीयांश स्थावर मालमत्ता आहे. सात लाख रुपयांचे वाहन यशोमती ठाकूर यांच्याकडं असून नाशिक जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बुद्रुक या ठिकाणी 10.66 हेक्टर आर शेती तसंच लेहगाव येथे 0.42 आर शेती त्यांच्याकडं आहे.
प्रताप अडसड यांच्या मालमत्तेत पाच वर्षात 87 लाखांनी वाढ : धामणगाव रेल्वे मतदारसंघात गत निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले प्रताप अडसड पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत. प्रताप अडसड यांची जंगम मालमत्ता दीड कोटींची आहे. 2019 मध्ये दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या मालमत्तेत आता 87 लाखांनी वाढ झाली. त्यांच्याजवळ सध्या पाच लाख रुपये रोख आहेत. याशिवाय 300 ग्रॅम सोनं स्वतःकडं आणि पत्नीकडं सहाशे ग्रॅम सोनं आहे. तसंच एक किलो चांदी देखील त्यांच्या पत्नीच्या नावे असून त्यांच्याजवळ 14.75 लाख रुपयांचं वाहन देखील आहे. प्रताप अडससड यांनी 29 लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज घेतलं असून त्यांच्या जवळ बुलेट आणि 29.40 लाख रुपयांची टाटा सफारी गाडी देखील आहे.
वीरेंद्र जगताप यांच्याकडं साडेतीन कोटींची संपत्ती : धामणगाव रेल्वे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्याकडं साडेतीन कोटींची संपत्ती आहे. त्यांच्याजवळ दोन चार चाकी वाहनं आहेत. तसंच 247 ग्रॅम सोनं आणि तीन हजार सहाशे ग्रॅम चांदी आहे. वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी उत्तरा जगताप यांच्या जवळ 600 ग्रॅम सोन्यासह तीन कोटीची जंगम संपत्ती आहे.
राजेश वानखडे यांच्याजवळ 3.75 कोटींची संपत्ती : तिवसा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये भाजपाचे उमेदवार असणारे राजेश वानखडे यांच्याजवळ दोन लाख रुपये रोख आणि 3.75 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती, त्यांनी शपथपत्रात नोंदविलीय. त्यांच्या पत्नीजवळ दोन लाख रुपये रोख आणि विविध बँक खात्यामध्ये 2.50 लाख रुपये जमा आहेत. नवसारी, वडाळी, यावली, देवरा इत्यादी ठिकाणी एकूण सहा एकर शेती राजेश वानखडे यांच्याजवळ आहे. तिवसा येथे त्यांचे दोन प्लॉट असून अमरावती शहरातील हॉटेल हेरिटेजमध्ये त्यांची भागीदारी आहे. मुंबई आणि मुलुंड येथे त्यांच्याजवळ भागीदारीत फ्लॅट असून त्याची एकूण किंमत 6.17 कोटी इतकी आहे.
बबलू देशमुख यांचं वार्षिक 18 लाख 37 हजार उत्पन्न : अचलपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आता पाचव्यांदा उमेदवार असणारे बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख यांची जंगम मालमत्ता 25.28 लाख इतकी असून स्थावर संपत्ती 6.9 कोटी असल्याचं शपथपत्रात नमूद आहे. आयकर विवरण पत्रानुसार बबलू देशमुख यांचं वार्षिक उत्पन्न 18 लाख 37 हजार 700 रुपये इतकं आहे. तळवेल सोसायटीचं तीन लाख रुपयांचं कर्ज त्यांच्यावर असून भागीदारीमध्ये परतवाडा येथे 3.45 कोटी रुपयांचा प्लॉट त्यांच्याजवळ आहे. तळवेल येथे घर आणि 11.62 हेक्टर आर इतकी शेती देखील बबलू देशमुख यांच्याकडं आहे.
हेही वाचा -