नवी दिल्ली PM Narendra Modi : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट औरंगजेबाशी केली होती. यावर आता खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच प्रत्युत्तर देत त्यांच्यावर प्रहार केलाय. विरोधकांनी औरंगजेबावरुन मला 104 वेळा अपशब्द वापरला आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूक आम्ही जिंकणार असल्यानं यामुळं काहीही होणार नाही.
104 वेळा वापरले अपशब्द : एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत आणि आमच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांच्या योजनाही बनवत आहोत. तर दुसरीकडे आमचे विरोधकही नवनवे विक्रम करत आहेत. आज त्यांनी मला 104 व्यांदा अपशब्द वापरले आहेत. त्यांनी मला औरंगजेबाच्या नावानं गौरवलंय. आज आपण विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारताबद्दल बोलत आहोत. अवघ्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5 व्या स्थानावर गेली आहे. हे काहीच नाही, अजून बरच पुढं जायचंय."
विरोधकांना काय म्हणाले मोदी : खासदार संजय राऊतांनी मोदींची तुलना औरंगजेबासोबत केली होती. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज जेव्हा गरीब मला आशीर्वाद देतात तेव्हा विरोधकांच्या मनात शिव्या फुटतात. आज हे लोक त्या गरीब लोकांना शिव्या देतात आणि मला पण, पण त्या शिव्यांमुळे मला काही फरक पडणार नाही, कारण जनता आमच्या सोबत आहे."
काय म्हणाले होते संजय राऊत : बुलडाण्यातील मेळ्यावात बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. औरंगजेबाचा जन्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ (गुजरातमध्ये) झाला होता. त्यामुळं नरेंद्र मोदी औरंगजेबाच्या मानसिकतेनं आपल्यावर हल्ला करतात."त्यांच्या या वक्तव्यानं आता चांगलंच राजकारण तापलंय.
हेही वाचा :