नांदेड PM Narendra Modi Rally : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज मराठवाड्यात दोन सभा होणार आहेत. मराठवाड्यातील परभणी आणि नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभा होत आहेत. यामुळं नांदेडसह हिंगोली आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील डॅमेज कंट्रोल सभेनं होईल, अशी अपेक्षा महायुतीच्या उमेदवारांना आहे. तर मोदींच्या बुस्टर डोसनं मतदारांवर किती परिणाम होईल, याची चिंता प्रतिस्पर्धी उमेदवारांना लागली आहे. या सभेसाठी पोलीस विभागाकडून नांदेडमध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आलीय.
उमेदवारांचा प्रचार शिगेला : नांदेड लोकसभा मतदारसंघात महायुतीनं भाजपाचे प्रतापराव चिखलीकर यांना, तर महाविकास आघाडीनं काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना रिंगणात उतरविलंय. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीनं अविनाश भोसीकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. प्रत्येक उमेदवार आणि त्या पक्षाचे नेते प्रचाराला लागले आहेत. मागील पाच वर्षांत झालेल्या राजकीय उलाथापालथ आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळं नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलली आहेत.
उमेदवारी देताना अनेकांची नाराजी : नांदेडमध्ये भाजपात नव्यानं प्रवेश घेतलेले अशोकराव चव्हाण यांच्या नातेवाईक डॉ. मीनल खतगावकर यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. परंतु, भाजपानं प्रतापराव चिखलीकर यांनाच पुन्हा रिंगणात उतरविलंय. तर परभणीत रासपचे महादेव जानकर यांना आणि हिंगोलीमध्ये ऐनवेळी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट करुन शिवसेनेचे बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आलीय. या राजकीय घडामोडीमध्ये अनेकांची नाराजी झाल्याचं पाहायला मिळालं.
दहा वर्षांत मोदींची नांदेडमध्ये चौथी सभा : नांदेड हा पूर्वीपासून काँग्रेसचा बाल्लेकिल्ला राहिलाय. नांदेड लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक काळ काँग्रेसच्या ताब्यात राहिला. 2014 मध्ये मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसच्या केवळ दोन जागा निवडून आल्या होत्या. त्यात नांदेड आणि हिंगोलीचा समावेश होता. मराठवाड्यात काँग्रेसचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये एक आणि 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रत्येकी एक सभा घेतली होती. शनिवारी नांदेड जिल्ह्यातील चौथी आणि या लोकसभेच्या प्रचारासाठी मराठवाड्यातील पहिली सभा होत आहे.
परभणीतही सभा : नांदेडनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. शहरातील पाथरी रोड भागात ही सभा होणार असून याची जय्यत तयारी महायुतीकडून करण्यात आलीय. विशेष म्हणजे परभणीत लोकसभा निवडणुकीत प्रचारसभा घेणारे नरेंद्र मोदी तिसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी राजीव गांधी आणि व्ही. पी. सिंग यांनी तेव्हाच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या.
हेही वाचा :