मुंबई - विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली आहे. हे नेते अर्ज मागे घेणार की निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपली ताकद दाखविणार? हे आज स्पष्ट होणार आहे.
२९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. राज्यातील एकूण २८८ मतदार संघामध्ये वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या ७०६६ इतकी आहे. त्यानंतर राज्यात अनेक प्रमुख मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी समोर आली आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांची दिवाळी या नाराज बंडखोरांची समजूत काढण्यातच गेली. आता यामध्ये कोणाला कितपत यश आले आहे? हे आज दुपारी ३ वाजेपर्यंत समोर येईल. त्यानंतर राज्यातील सर्व मतदार संघातील लढतींच चित्र स्पष्ट होईल.
दुपारी ३ वाजता चित्र स्पष्ट होणार- यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वात जास्त उमेदवार भाजपा पक्षाचे आहेत. असे असले तरी बंडखोरांची संख्याही भाजपमध्ये जास्त दिसते. अनेक मतदारसंघात नाराज भाजपा कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावरून भाजपामधील अंतर्गत खदखद मोठ्या प्रमाणावर चव्हाट्यावर आल्याचं दिसून येतं. नाराज बंडखोरांची समजूत काढण्यासाठी भाजपा नेत्यांची दिवाळी खर्च झाली. त्यातच बंडखोरांनी जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर पक्षातून थेट सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येईल, असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. आता यामध्ये त्यांना कितपत यश येतं हे आज दुपारी तीन वाजता समोर येईल. महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत तिच परिस्थिती आहे. येथेही बंडखोरांचे प्रमाण जास्त आहे. याकरिता नाराज बंडखोरांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना कितपत यश आले आहे, हे आज दिसून येईल.
मैत्रीपूर्ण लढतींकडे लक्ष- महाविकास आघाडीमध्येसुद्धा बंडखोरांची संख्या फार मोठी आहे. यात प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे) या पक्षात बंडखोर जास्त आहेत. राष्ट्रवादीत ( शरदचंद्र पवार ) बंडखोरांची संख्या जास्त नाही. त्याचबरोबर ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही मतदार संघावर महाविकास आघाडी किंवा महायुतीतील दोन पक्षांनी दावा केला आहे. त्याकरता या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होईल की उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील? यावरही आज निर्णय घ्यावा लागणार आहे.
मुंबईतील प्रमुख बंडखोर उमेदवार
१) बोरिवली - गोपाळ शेट्टी (भाजपा)
२) भायखळा - मधु चव्हाण (काँग्रेस)
३) अणुशक्ती नगर - दिनेश पांचाळ (भाजपा)
४) माहीम - सदा सरवणकर (शिवसेना)
५) वर्सोवा - राजू पेडणेकर (शिवसेना UBT)
हेही वाचा-