नांदेड Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून, अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. नितीन गडकरी यांच्या मतदारसंघाचं मतदान झालं असून, आता ते राज्यातील इतर भागात प्रचार सभा घेत आहेत.
मी फोकनाड लिडर नाही : "मी फोकनाड लीडर नाही, जे आश्वासनं दिलं आहे ते पूर्ण करणार," असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय. नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या देगलूर येथील प्रचार सभेत गडकरी बोलत होते. "शेतकऱ्यांच्या समृद्ध आणि संपन्नतेसाठी पुढील काळात इथेनॉलवर भर दिला जाणार आहे. यामुळं शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. यामुळं जनतेनं भाजपाला मतदान द्या," असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय.
16 लाख कोटी रुपयाचे पेट्रोल, डिझेल आयात : नितीन गडकरी पुढे म्हणाले की, "मी जे बोलतो ते करुन दाखवतो. तूर, गहू, तांदूळ लावून शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी अन्न पिकवून सर्व जनतेची सोय केली. बळीराजा मात्र, सुखी-समृद्धी झाला नाही. खताच्या, बियाण्याच्या, कापडाच्या किंमती वाढल्या. तसेच गहू महाग झाला. ब्रेड, बिस्कीट महाग होतात, संत्रा-मोसंबी स्वस्त होतात आणि ज्यूस महाग होतो. आमचं सरकार 2004 पासून लढत होतं. त्या काळात 16 लाख कोटी रुपयाचे पेट्रोल, डिझेल इंधन आयात करत होतो. उसाच्या रसापासून, उसाच्या मळीपासून, बांबूपासून आणि सडलेल्या अन्नापासून इथेनॉल आपल्या इथे तयार होत आहे. त्यामुळं इंधनाची आयात कमी झाली असून, देशावर इंधनाच्या लागणारा खर्च कमी झाला."
सरकार प्रयत्नशील : "मागील 10 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात रस्ते आणि पायाभूत सुविधा पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालं. महामार्गांच्या माध्यमातून गावं-तालुक्यांची ठिकाणं मोठ्या शहरांना जोडण्यात आली. यामुळं गावांचा प्रगतीचा मार्ग अधिक सुकर झाला. यापुढंही स्मार्ट सिटीसोबतच स्मार्ट व्हिलेजची संकल्पना देखील प्रत्यक्षात आणण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे. आजवर जनतेनं आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळंच हे शक्य झालंय. यापुढंही जनता सहकार्य करेल," असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा -
- ठाकरे गटाचं प्रचार गीत वादात; उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच झापलं, मोदी-शाहांवरही हल्लाबोल - Uddhav Thackeray on ECI
- दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात लोढा की नार्वेकर? 'सागर'वर रात्री महत्त्वपूर्ण बैठक - South Mumbai
- मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; पहिल्या टप्प्यात केलं होतं मतदान - Kunwar Sarvesh Singh