मुंबई Nitesh Rane On Uddhav Thackeray : कोकणातील साडेसहा लोकसभा मतदारसंघांपैकी भिवंडी सोडला तर सर्वत्र आपण विजयी झालो आहोत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणातील जनतेने नाकारलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात पैशाच्या जोरावर नारायण राणे विजयी झाले आहेत. जसे पेपर आणि दुधाच्या पिशव्या टाकल्या जातात तशी पैशाची पाकीट कोकणात मतदारसंघात वाटली गेली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. यावर बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, कोकणातल्या लोकांनी लोकशाही पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नाकारलं हे सत्य जेव्हा नारायण राणे यांनी उघड केलं तेव्हा, अपेक्षेप्रमाणं संजय राऊत यांना मिरच्या लागल्या. पैसे देऊन मतदान केलं हे संजय राऊत, विनायक राऊत म्हणत आहेत. मग याचा असा अर्थ होतो की, कोकणातील माणूस पैसा खातो का? असेही राणे म्हणाले आहेत.
कोकणात पाय ठेवू देणार नाही : नितेश राणे पुढे म्हणाले आहेत की, आमच्या कोकणातील जनता इतकी स्वाभिमानी आहे की आतापर्यंत कुठल्याही सरकारकडं कर्जमाफी मागितली नाही. घेतलेल्या कर्जाची योग्य वेळेत परतफेड करणं याची आमच्या कोकणातील जनतेला सवय आहे. म्हणून आमच्या कोकणातील स्वाभिमानी जनतेचा अपमान जर अशा पद्धतीने कोणी करत असेल तर आमच्या कोकणातील जनता शांत बसणार नाही. पैशाच्या जोरावर नारायण राणे जिंकले असा खोटा प्रचार उद्धव ठाकरे व त्यांच्या लोकांकडून केला जात आहे. हा कोकणातील जनतेचा अपमान आहे, म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोकणातील जनतेची माफी मागावी. कोकणातील जनतेने पैसे खाल्ल्याचा आरोप जर तुम्ही परत केला, तर तुम्हाला आम्ही कोकणात पाय ठेवू देणार नाही. असा धमकी वजा इशाराही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
तुम्ही ईव्हीएममध्ये सेटिंग केली : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक निकालावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, रवींद्र वायकर यांच्या बाजूने पारदर्शकपणे निकाल लागला आहे. तरी तो उद्धव ठाकरे यांना मान्य नाही. कारण स्वतःच्या बाजूने त्यांचा निकाल लागला नाही. मग तुम्ही ईव्हीएम, निवडणूक आयोगावर आरोप करायचा. पण जिथे तुमचे खासदार निवडून आले आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही ईव्हीएममध्ये सेटिंग केली असा आरोप आम्ही करायचा का? जनतेने दिलेला कौल हा मोठ्या मनानं स्वीकारता आला पाहिजे. तशी मानसिकता असली पाहिजे. पण दुर्दैवानं नेहमी कॉपी करून पास होणारे उद्धव ठाकरे यांना कधीही पारदर्शक पद्धतीने निवडणुका आणि जनतेचा कौल ते स्वीकारतील इतक्या मोठ्या मनाचे ते नाहीत असा टोलाही, नितेश राणे यांनी लगावला आहे.
हेही वाचा -
- कोकणात नारायण राणेंचा डंका; विनायक राऊतांचा पराभव, नितेश राणेंकडून जल्लोष - Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Results 2024
- लोकसभा निवडणूक 2024 मतदान; नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये सामना; नारायण राणेंनी केलं 'हे' आवाहन - Lok Sabha Election 2024
- नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, ठाकरेंच्या भाषणामुळं मत परिवर्तन होईल? - Lok Sabha Election 2024