सिंधुदुर्ग : कोणताही गाजावाजा न करता कुडाळ-मालवण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी आज (28 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार नारायण राणे, नितेश राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर उपस्थित होते.
काय म्हणाले निलेश राणे? : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मी आज महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज कणकवली देवगड मतदारसंघाचे आमदार देखील अर्ज भरणार आहेत. आम्ही सर्व त्यांच्या रॅलीला जाणार असून तिकडे सभा होणार आहे. इकडं केवळ अर्ज भरला. बाकी शक्तिप्रदर्शन करण्याची आम्हाला गरज नाहीय. आम्ही सातत्यानं जनतेसोबत असतो आणि मला खात्री आहे की जनताही आम्हाला साथ देतील." तसंच मी एक साधा कार्यकर्ता असून सर्वसामान्यांचं काम करण्यासाठीच लढतोय, असंही निलेश राणे म्हणाले.
...त्यामुळं हाती घेतला 'धनुष्यबाण' : गेल्या काही वर्षापासून निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात भाजपाची बांधणी केलीय. याचे सकारात्मक परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत दिसून आले होते. कुडाळ मतदारसंघातून खासदार नारायण राणे यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळं हा मतदारसंघ भाजपाला मिळावा यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आग्रही होते. परंतु, महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडं गेल्यानं निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन धनुष्यबाणावर निवडणूकीत उतवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बघायला मिळतंय.
हेही वाचा -