मुंबई NCP Sharadchandra Pawar Symbol : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्ष चिन्ह (घड्याळ) अजित पवार गटाला दिलं. तसंच शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' असं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. त्यानंतर आता शरद पवार गटाला चिन्हही बहाल करण्यात आलंय. 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगानं त्यांना दिलंय. मात्र, या चिन्हाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार का?, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलेलं पहायला मिळतंय.
राजकीय विश्लेषकांचं मत काय? : या संदर्भात आपलं मत व्यक्त करत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, "शरद पवार यांच्यासाठी नवीन चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरं जाणं ही बाब निश्चितच नवी नाही. शरद पवार जेव्हा पहिल्यांदा राजकारणात आले, तेव्हा त्यांनी 'बैल जोडी' या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांना 'चरखा' या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. आणीबाणीनंतर चरखा हे चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांना काँग्रेसचा 'हाताचा पंजा' या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती."
आत्तापर्यंत बदललेलं पाचवं चिन्ह : पुढं ते म्हणाले की, "1999 मध्ये शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करत पक्षाचं चिन्हं 'घड्याळ' ठेवलं. आता शरद पवार पुन्हा एकदा नवं चिन्हं घेऊन मतदारांसमोर येत आहेत. 'तुतारीवाला माणूस' हे शरद पवारांचं पाचवं चिन्ह आहे. मात्र, असं असलं तरी शरद पवार हे सातत्यानं नवीन चिन्हांसोबत जनतेसमोर गेले आहेत. प्रत्येक वेळेस त्यांनी विजय प्राप्त केलाय. परंतु, राजकारणातील तेव्हाची परिस्थिती आणि शरद पवार यांच्या उमेदीचा काळ या गोष्टीसुद्धा पाहाव्या लागतील. शरद पवार हे आता 84 वर्षाचे आहेत. अशा परिस्थितीत त्यांना नव्या चिन्हासोबत जनतेसमोर जावं लागतय. त्यामुळं त्यांना यावेळी किती यश मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल. त्यांना मिळणारं राजकीय यशापयश हे वेगवेगळ्या कारणांवर आणि परिस्थितीवर अवलंबून असलं तरी हे चिन्ह मात्र ते लोकांपर्यंत पोहोचतील", असा दावा जोशी यांनी केलाय.
महाराष्ट्रात तुतारी वाजणार : नव्या चिन्हासंदर्भात प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आम्हाला निवडणुकांसाठी चिन्ह कोणतं मिळालं त्यानं काही फरक पडणार नाही. कारण आमच्याकडं शरद पवार हे योद्धे आहेत. नव्या निवडणूक चिन्हासह 84 वर्षांचा हा योद्धा आता महाराष्ट्रात उतरेल. त्यामुळं महाराष्ट्रात नक्कीच तुतारी वाजेल. जनता आम्हाला पुन्हा एकदा भरभरून मतं देईल", असा विश्वासही यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केला.
मतांवर परिणाम होणारच : यासंदर्भात बोलताना एकेकाळी शरद पवारांचे निष्ठावान सहकारी मानले जाणारे आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "जेव्हा नवीन चिन्ह घेऊन लोकांसमोर जावं लागतं तेव्हा थोडा-फार परिणाम होतोच. आता प्रसार माध्यमं आणि स्मार्टफोन असल्यानं कदाचित तो परिणाम थोडा कमी होईल. परंतु, काहीतरी परिणाम होणारच आहे. 1999 मध्ये जेव्हा आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. तेव्हा जनतेनं घड्याळ या चिन्हाऐवजी काँग्रेसच्या हातावर मतदान केलं होतं. किमान 25 टक्के तरी मतदान त्यावेळी कॉंग्रेसच्या हाताला गेलं होतं", अशी आठवण मंत्री भुजबळांनी सांगितली.
हेही वाचा -
- शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं दिलं नवं चिन्ह; चिन्ह मिळताच शरद पवार गटाची खास पोस्ट
- काकांविरोधात बंड करणाऱ्या अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याची 'आजोबां'ना साथ, राजकारणात होणार सक्रिय?
- पक्ष मी काढला अन् चिन्ह त्यांना दिलं हा सत्तेचा गैरवापर; शरद पवारांचा हल्लाबोल, इंडिया आघाडीत वाद असल्याचंही केलं मान्य