मुंबई Supriya Sule On NCP MLA Disqualification Case : राज्यातील विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आझाद मैदानावर गेल्या दोन महिन्यांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. याच पार्श्वभूमीवर आज (15 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
...तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ : यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी निर्णयावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "आजच्या निकालातून माझी काहीच अपेक्षा नाही. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की अदृश्य शक्ती सर्वच ठरवत असते. मग कशी अपेक्षा ठेवणार?", असा सवाल त्यांनी केला. तसंच सर्व आमदार अपात्र झाले तर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अदृश्य शक्तीचं पाप : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याविषयी बोलताना सुळे म्हणाल्या,"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे काल, आज आणि उद्याही असतील. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप अदृश्य शक्ती करत आहे. हे महाराष्ट्रातच नाही तर देशात नवा पायंडा पाडत आहेत."
मेरिटवर निर्णय व्हावा : सहानुभूती मिळवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावरील अंगणवाडी सेविकांची भेट घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री अनिल पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाचा निर्णय मेरिटवर व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा -