मुंबई NCP Press Conference : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी (19 एप्रिल) पार पडलं. महाराष्ट्रात पाच लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. त्यानंतर आज (20 एप्रिल) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक विकासात्मक कामं केली आहेत. त्यामुळं लोकांनी चांगल्या पद्धतीनं महायुतीला मतदान केलंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा 22 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येणार असून या जाहीरनाम्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विकासाचे व्हिजन असेल, असं सांगितलं.
आमचे व्हिजन विकासाचे : महायुतीतील तिन्ही पक्ष चांगल्या पद्धतीनं प्रचार करत आहेत, आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा 22 तारखेला सोमवारी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होणार आहे. या जाहीरनाम्यात विकासाचे व्हिजन आणि यापूर्वी लोकहिताची केलेली कामं याबाबत माहिती असेल. परंतु, विकास हेच केंद्रबिंदू आमच्या जाहीरनाम्यात असेल. या जाहीरनाम्याला बिल्कुल उशीर झालेला नाही, असंही परांजपे म्हणाले.
पहाटेचा शपथविधी सहमतीने : पुढं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी संदर्भात बोलताना ते म्हणाले, आम्ही जेव्हा पक्षातून वेगळी भूमिका घेतली तेव्हा पक्षाच्या पहिल्या सभेत अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल खुलासा केला होता. पवार साहेबांच्या सहमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला असं अजितदादांनी म्हटलं होतं. यानंतर कालही इंदापूरच्या सभेमध्ये अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी हा शरद पवार साहेबांच्या सहमतीनं झाला होता असं म्हटलंय.
नाशिकच्या जागेवर पक्षाचा दावा कायम : महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अजून कायम आहे. हा तिढा सुटला नाही आहे मात्र दुसरीकडे आपल्या पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी या जागेवरून माघार घेतली आहे. त्यामुळे ही जागा आता कुणाला जाणार? असा प्रश्न आनंद परांजपे यांना विचारला असता ते म्हणाले, छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरून वैयक्तिकरित्या माघार घेतली आहे. परंतु 'मी या जागेवरून माघार घेतली असली तरी पक्षाचा दावा या जागेवर कायम आहे', असं सूचक वक्तव्यही भुजबळांनी केलं. त्यामुळं पक्षाचा दावा इथं कायम असल्याचं परांजपे म्हणाले.
...त्यामुळंच शिवतारेंबरोबर शत्रुत्व : विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर ठाम होते. मात्र, त्यानंतर त्यांनी माघार घेतली. याविषयी विचारण्यात आलं असता परांजपे म्हणाले की, "विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं होतं. त्यामुळं विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती. परंतु वैयक्तिक अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात शत्रुत्व नव्हतं, असं परांजपे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
- Supriya Sule : छगन भुजबळांचे आरोप, भाजपाची ऑफर अन् पहाटेचा शपथविधी... वाचा सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
- Sharad Pawar on Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांची गुगली; पवार-फडणवीसांमध्ये वाकयुद्ध, पाहा कोण झाले बोल़्ड
- Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस जागेपणीच बडबडतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- संजय राऊतांचा खोचक टोला