अमरावती : माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्याच्या धमकीच पत्र स्पीड पोस्टद्वारे प्राप्त झाल्यानं खळबळ उडाली. धमकीचं हे पत्र अमीर नावाच्या व्यक्तीनं हैदराबाद येथून पाठवलं आहे.
काय दिली धमकी : "तुम्ही हिंदूंबाबत अधिक बोलता हे योग्य नाही. मला दहा कोटी रुपये द्या, अन्यथा मी तुमच्या घरासमोर.... तुमच्यासोबत काही अनर्थ देखील मी करणार. तुमच्यावर सामूहिक अत्याचार केला जाईल," अशी धमकी या पत्राद्वारे नवनीत राणा यांना देण्यात आली. माझे नातेवाईक दुबई आणि पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख देखील या पत्रात आहे. तुम्हाला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देखील या पत्राद्वारे देण्यात आली. ही माहिती नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या पत्रासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे, असं विनोद गुहे यांनी सांगितलं.
इंग्रजी लिपीत हिंदीतून धमकी : हैदराबाद येथील अमीर नावाच्या व्यक्तीनं माजी खासदार नवनीत राणा यांना पाठवलेलं धमकीचं पत्र हे इंग्रजी भाषेतील लिपीमध्ये लिहिलं आहे. त्याचा मजकूर मात्र हिंदीमध्ये आहे. पांढऱ्या रंगाच्या कागदावर मागून पुढून हे पत्र लिहिण्यात आलं. हे पत्र ज्या पाकीटमधून पाठवण्यात आलं, त्या पाकिटावर 'एमपी. एन रवी राणा नॉर्थ अमेरिका नवी दिल्ली' या पत्त्यासह रवी राणा यांच्या शंकर नगर येथील घराचा पत्ता खाली बारीक अक्षरात इंग्रजीमध्ये लिहिला आहे.
'नवनीत राणा' चर्चेतला चेहरा : विविध कारणांमुळं नवनीत राणा या नेहमी चर्चेत असतात. सुरुवातीला अपक्ष म्हणून लोकसभा लढवणाऱया राणा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना भाजपानं तिकीट दिलं होतं. मात्र, अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता.
हेही वाचा