नाशिक Nashik Loksabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवून तिसऱ्यांदा लोकसभेत जातील असं म्हणत त्यांनी एकप्रकारे गोडसंची उमेदवारीच जाहीर केलीय. शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीनं नाशिकला कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते.
हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा : "खासदार हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचं आहे. दुसरं कोणाचं नाव नाही. महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणायचे आहेत. त्यात गोडसेही असतील", असे खासदार शिंदे यांनी म्हटले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे : शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या सुरवातीला खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांना सांगा की, प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण हा नाशिकमध्येच राहिला पाहिजे. असं म्हटल्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात मी त्यांना सांगू इच्छितो की, "आपला धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पूर्ण बहुमतानं पाठवायचं आहे."
अब की बार 400 पार, महाराष्ट्रात 45 पार : पुढे खासदार शिंदे म्हणाले, " स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं की, अयोध्या मंदिर, 370 कायदा हे सगळं मोदींनी पूर्ण केलं. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत आहेत. 'अब की बार 400 पार' आणि महाराष्ट्रात 45 पार महायुतीचे खासदार पाठवायचे. त्यात हेमंत गोडसेंनाही पाठवायचं आहे. त्यामुळं फक्त गोडसेंनी काम करायचं, असं नाही. आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. घराघरापर्यंत आपलं काम पोहोचवायचं आहे," असंही खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय.
भाजपाकडून नाशिकच्या जागेचा आग्रह- एकीकडे जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना, श्रीकांत शिंदे यांची ही घोषणा भाजपला मान्य असणार का? कारण नाशिक लोकसभेची जागा भाजपाला मिळावी, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह केला. त्यामुळं श्रीकांत शिंदे यांनी केलेली घोषणा कितपत खरी ठरते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकमधून शांतीगिरी महाराज हेदेखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. नुकतीच शांतीगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंना तिकीट मिळणार का? याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीरपणे हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं.
हेही वाचा :