नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना मोठा धक्का दिला. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या गणेश गीते यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं (एसपी) नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
भाजपानं उमेदवारी नाकारल्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी बंड पुकारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एसपी प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर गणेश गीते हे तुतारी चिन्हावर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपाचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात गणेश गीते अशी नाशिक पूर्व मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे.
कोण आहेत गणेश गीते? गणेश गीते यांनी भारतीय जनता पक्षाकडून नाशिक महानगरपालिकेत सलग दोन वेळा स्थायी समिती सभापती पद सांभाळले आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय अशी गणेश गीते यांची ओळख आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत आणि मुंबईत भेट घेतली होती. अखेर ही भेट महत्त्वपूर्ण ठरली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी गणेश गीते यांच्या उमेदवाराला हिरवा कंदील दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षात प्रवेश झाला आहे.
नाशिक पूर्वमध्ये काय आहेत राजकीय समीकरणे? गणेश गीते यांच्याबरोबरच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून जगदीश गोडसे आणि अतुल मते हेदेखील इच्छुक होते. मात्र, शरद पवार यांनी अखेर गणेश गीते या नावाला पसंती दिली. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात कमळ विरुद्ध तुतारी असा सामना रंगणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी भाजपाला 'जय श्रीराम' केल्यानं नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाला राजकीय धक्का बसला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आर्थिक दुवा असणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेले गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एसपी) प्रवेश केल्यानं जिल्ह्यातील राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर बदलणार आहेत. गणेश गीते यांना ओबीसी समाजातून चांगला पाठिंबा आहे. त्यांच्या जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या १५ पैकी बहुतांश विधानसभा मतदासंघात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपाला खिंडार- सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात मजल गाठलेले गणेश गीते यांना कोणतीही राजकीय घराण्याची पार्श्वभूमी नाही. त्यांना सलग दोन वेळा नाशिक महानगरपालिकेची आर्थिक तिजोरी सांभाळण्याची जबाबदारी मिळाली होती. या संधीचं सोनं करत त्यांनी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी शहरात रस्ते, क्रीडांगण, पाणी, शहर बससेवा आणि विशेष म्हणजे कोविड काळात काम करून इतर महत्त्वाच्या असलेल्या विकास कामांनाही गणेश गीते यांनी प्राधान्य दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातून गणेश गीते यांची उमेदवारी निश्चित झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश गीते यांच्यासोबत काही भाजपचे आणखी काही नगरसेवक गेल्यास पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठं खिंडार पडणार आहे.
हेही वाचा-