नांदेड : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. मतदानानंतर आता राज्यात महाविकास आघाडी की महायुतीची सत्ता येणार? याबाबतचा अंदाज विविध एक्झिट पोलकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र नेते त्यांचच सरकार येईल असा दावा करत आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार : "जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरगडला भेट देण्यासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट केलय. तसंच महाविकास आघाडी बहुमताने सरकार स्थापन करेल" अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
काँग्रेसला 75 प्लस जागा मिळतील : "राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. आता सर्वांचं लक्ष हे निकालाकडं लागलं आहे. त्यातच आता वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून कुणाचं सरकार येणार याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यातील काहींमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असं दाखवत असल्यानं, आपलं सरकार येणार," असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. "महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येईल आणि काँग्रेसला 75 प्लस जागा मिळतील" असा दावाही त्यानी केला. तर मुख्यमंत्री तुम्ही व्हावं असं वाटतंय का? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, सर्व पक्षाचं म्हणणं असेल तर मुख्यमंत्री होईन. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. विविध यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. यावर नाना पटोले यांनी या एक्झिट पोलचे दावे फेटाळून लावले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान : राज्यात बुधवारी विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडल्या. विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ६५.११ टक्के मतदान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के एवढं मतदान झालं. तर मुंबई शहर ५२.०७ टक्के आणि मुंबई उपनगरात ५५.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
हेही वाचा -