नागपूर MNS Vs Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. राजकारणापलीकडं जाऊन हे दोघे नेते मैत्री जपत आले आहेत. मात्र, यावेळी चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections 2024) राज ठाकरे यांचा पक्ष 288 पैकी 230 जागेवर आपले उमेदवार देणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचाही समावेश असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अद्याप नावाची घोषणा नाही : राज ठाकरे केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवार देणार नाहीत तर, उमेदवार अंतिम झाल्याचंसुद्धा आता स्पष्ट होतंय. राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असताना विदर्भातील अनेक उमेदवार फायनल झाले आहेत. मात्र, त्यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यात दक्षिण-पश्चिम नागपूर आणि विदर्भातील अनेक उमेदवारांचा समावेश आहे, अशी माहिती मिळत आहे.
मनसे देणार उमेदवार : मनसे यावेळी विधानसभा निवडणुकीत 230 उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचं राज ठाकरे यांनी हे आधीचं जाहीर केलंय. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं कुणासोबतही युती, आघाडी केली नाही. त्यामुळं मनसे यावेळी संपूर्ण ताकदीनिशी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात उमेदवार देणार आहे.
फडणवीसांविरोधात तुषार गिरे यांचं नाव चर्चेत : मध्यंतरी राज ठाकरे यांनी पश्चिम विदर्भाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवार देणार असं स्पष्ट संकेत दिले होते. मुळात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कुणाला मैदानात उतरवले जाईल, याबाबत उत्सुकता होती. मात्र, सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, तुषार गिरे यांचं नाव चर्चेत आहे. त्यांच्या नावाची घोषणाही होवू शकते, असं देखील बोललं जातंय. त्यामुळं नागपुरात फडणवीस यांच्याविरोधात तुषार गिरे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
- राज ठाकरे यांचे अमरावती जल्लोषात स्वागत; विदर्भातील विधानसभेच्या सर्व जागांचा घेणार आढावा - Raj Thackeray In Amravati
- भाजपाचा विदर्भावर 'फोकस'; लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळं पीएम मोदी, शाहांचे दौरे वाढले - Assembly Elections 2024
- "विधानसभेला मतदारांची गैरसोय झाल्यास..."; निवडणूक आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा - ECI Team Maharashtra Visit