मुंबई Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय. केंद्रीय निवडणूक आयोगानं अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र, सध्या सर्वच पक्षांकडून राजकीय डावपेच आखले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत असून, मनसेच्या सर्व उपनेत्यांची बैठक आज राज ठाकरे यांनी आपल्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीदरम्यान आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटिमुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? : महायुतीत जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरू असतानाच, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळं विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवतीर्थ निवासस्थानी उपनेते आणि निरीक्षकांची बैठक घेतल्यानंतर राज ठाकरे थेट एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वीस मिनिटं चर्चा झाली. या भेटीमागचा नेमका उद्देश काय? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे. तसंच या बैठकीत अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविल्यास महायुती त्यांना पाठिंबा देणार का? याबाबत राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे.
आज राजसाहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांची वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली.#MNSAdhikrut pic.twitter.com/IUZeFVsZGo
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 23, 2024
शिवसेनेच्या बालेकिल्यात मनसे : मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर हे शिवसेनेच्या तिकिटावर येथून निवडून आले होते. सदा सरवणकर हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असून ते सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्षही आहेत. सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी सरवणकर यांच्या नियुक्तीला मनसेनंही पाठिंबा दिला होता. त्यामुळं ही जागा मनसेला देण्याची विनंती राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं बोललं जातंय.
महायुती ठाकरेंना पाठिंबा देणार ? : शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत अमित ठाकरे यांनीही निवडणूक लढवावी, अशी अनेक पदाधिकार्यांनी केलीय. त्यामुळं अमित ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवल्यास, ते कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावरही बैठकीत चर्चा झाली. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महायुतीनं त्यांना पाठिंबा द्यावा अशी, मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची देखील चर्चा आहे.
हेही वाचा
- सिनेट निवडणुका अराजकीय व्हाव्यात, भाजपाच्या आशिष शेलार यांची इच्छा - Mumbai University Senate Election
- तिरुपती प्रसाद वाद प्रकरण : चिराग पासवान कडाडले, म्हणाले, "करोडो भाविकांच्या आस्थेशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या" - Chirag Paswan on tirupati Prasad
- काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार का? संजय राऊत म्हणतात... - nana patole likely Chief Minister
- साताऱ्यात दिसलं शरद पवारांचं 'जेम्स बॉन्ड' कनेक्शन; 'व्हीआयपी' नंबरच्या मर्सिडीजनं वेधलं लक्ष - Sharad Pawar Car Satara Visit