रत्नागिरी MLA Yogesh Kadam on Bhaskar Jadhav : शिवसेना (शिंदे गट) आमदार योगेश कदम यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहित मनात काही खंत आहेत, त्या उघड करायच्या आहेत असं म्हटलंय. यावर बोलताना योगेश कदमांनी त्यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दापोलीत सभा घेणार आहेत. त्याचा आढावा घेतल्यानंतर बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
काय म्हणाले योगेश कदम : यावेळी बोलताना आमदार योगेश कदम म्हणाले, "आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव देखील बॅग भरुन तयार होते. ही गोष्ट एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि मला माहिती आहे. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दोघांना बाजूला घेऊन विचारलं होतं की काय करायचं भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत. तेव्हा भास्कर जाधव यांच्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही मांडली होती. स्वतःचं खरं कसं आहे, हे रेटून न्यायचं आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करायचे या व्यतिरिक्त त्यांना काही येत नाही. शिवसेना-भाजपा अशी मजबूत पकड जेव्हा बसत होती, तेव्हाच त्यांना घ्यायला नकार दिला होता, तेव्हाच ते यायला तयार होते. आता कोणता पक्ष त्यांना घेईल असं मला वाटत नाही."
भास्कर जाधवांचं भावनिक पत्र : आमदार भास्कर जाधव यांनी 'या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे' असं म्हणत कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलंय. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळूण इथं एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया. असं आवाहन त्यांनी या पत्राद्वारे कार्यकर्त्यांना केलंय. मात्र आता योगेश कदमांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर कोकणातील राजकारण आणखी तापण्याची चिन्ह आहेत.
हेही वाचा :