मावळ (पुणे) Maval Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू आहे. मात्र दुसरीकडे मावळ तालुक्यात अजित पवारांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा नाट्य सुरू झालंय. मावळ तालुक्यातील अजित पवार गटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्त केला. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवर दुय्यम स्थान दिलं जात असल्यानं नाराजीतून हा राजीनामा देण्यात आल्याची सध्या चर्चा आहे.
पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर : अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुर्हे यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्यानं मावळात चर्चेला उधाण आलंय. मात्र अजित पवारांनी दिलेल्या आदेशानंतर मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकारानं मावळ तालुक्यात नाराज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या पदाचा राजीनामा हा वरिष्ठ पातळीवर नामंजूर करण्यात आलाय. गैरसमजातून काही घटना घडल्यानं मावळ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता. मात्र येणाऱ्या काळात कोणताच दुजाभाव कोणत्याही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी यांच्याबाबत होणार नाही, अशी हमी दिल्यानं सर्व नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली असून हे सर्व जण आता मावळ तालुक्यात अजित पवार गटाचच काम करणार असल्याचं स्पष्टीकरण मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिलंय.
अजित पवार गटाची ताकद कायम : मावळात तब्बल 25 वर्षांची भाजपाची सत्ता बाजूला करुन राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली ताकद तयार केली. मात्र, अजित पवारांच्या बंडानंतर मावळमधील एक गट अजित पवार यांच्याबरोबर तर उर्वरित गट हा शरद पवार यांच्याबरोबर गेला. त्यामुळं अजित पवार गट आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच मागील काही दिवसांपासून मावळमध्ये राजीनामा नाट्य सुरू असल्यानं शरद पवार गटाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, अजित पवारांनी लक्ष देत तालुकाध्यक्षांना नाराजी दूर करण्यास सांगितलं, यात मावळचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यशस्वी झाले. त्यामुळं अजित पवार गटाची ताकद कायम राहिलीय.
विनोद होगले यांचं पद गेलं आणि कार्यकर्ते भडकले : लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद होगले हे संघटनेत चांगलं काम करत असताना व संघटना वाढीसाठी विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवत असताना अचानक तडकाफडकी त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यात आला. याबाबत होगले यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. अजित पवार यांच्यापासून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या सर्वांना लोणावळा शहरातील व मावळ तालुक्यातील खदखद माहिती असताना व वारंवार त्यांच्या कानावर सर्व विषय घालण्यात आलेले असतानाही पक्ष नेतृत्व दखल घेत नसल्यानं अखेर नाईलाजास्तव आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं, अशी भूमिका राजीनामा देताना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
हेही वाचा :