छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ४ जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची भूमिका, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर केलीय. त्याच दिवशी नारायण गडावर जाहीर सभा होईल, त्यासंबंधी तयारी सुरू आहे. त्यानंतर लगेच आंदोलन सुरू होईल. आमचा हक्क आम्हाला दिला नाही तर, २८८ जागांवर आम्ही सर्व जाती धर्माचे लोक निवडणूक लढवणार असा इशारा, जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.
४ जून रोजी आंदोलन होणार सुरू : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मनोज जरांगे पाटील शहरात आले होते. यावेळी त्यांनी टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्यांनी ४ जून रोजी नारायण गडावर सभा घेणार असून त्याचवेळी उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. हा मुहूर्त वगैरे काही नाही, स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे. त्यांची लेकरं त्यांच्यासाठी एकत्र येत असतील तर आमचे लोक देखील आमच्याही मुलांसाठी एकत्र येतील. मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के आरक्षण दिलं ते कुणाच्याही फायद्याचं झालेलं नाही. यामुळं आमच्या मुलांचं वाटोळं झालं. त्यामुळं ४ जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे. त्यासाठी माझ्या समाजाला आवाहन करायची गरज नाही असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मोदींना महाराष्ट्रात यावे लागले : लोकसभा निवडणुकीमध्ये मी नव्हतो, आम्ही कुणाचा प्रचार केला नाही आणि कुणाला निवडून आणा असं सांगितलं नाही. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. फक्त मी एवढंच सांगितलं पाडा, कुणाला पाडायचं हे समाजाला कळलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच महाराष्ट्रात आले नव्हते, मात्र आता मोदी गोधड्यांसहित येथे येत आहेत. मोदी कधीच माध्यमांसमोर दहा वर्ष आले नाहीत. मात्र, आता ते माध्यमांसमोर बोलत आहेत. पूर्वी ते कुणाचाच प्रचार करत नव्हते. मात्र, ते आता सगळ्यांचा प्रचार करायला येऊ लागले. ही वेळ भाजपाच्या काही मोजक्या नेत्यांवर आलीय. या सगळ्या गोष्टीला पाच भाजपाचे स्थानिक नेते जबाबदार आहेत. या लोकांना बारा बलुतेदार, दलित, मुस्लिम, धनगरांबद्दल द्वेष आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीस पहिल्यांदा खर बोलले : राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांना माझ्या मागे लागायची काही गरज होती का? देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष थांबवला पाहिजे. त्यांनी महिलांवर अन्याय अत्याचार केले. चंद्रकांत पाटील म्हणतात की, मी स्वतः मला प्रमाणपत्र द्या असं मागितलं होतं, मला दिलं नाही म्हणून मी असं करतो. फडणवीस हे असे लोक सांभाळत आहेत. मोदींना सोलापूरमध्ये तीन सभा घ्याव्या लागल्या. फडणीस यांनी एक चांगलं काम केलं, ते काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जरांगे पाटील यांनी कोणत्या पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. ते आयुष्यात पहिल्यांदा खरं बोलले आहेत. ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी घरी बसवलं. त्यामुळं त्यांना मार्क द्यावा लागेल अशी मिश्किल टीका त्यांनी केलीय.
हेही वाचा -
- "मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांना विरोध करणाऱ्यांना असं पाडा की...", मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन - Manoj Jarange Patil Appeal
- विरोधात उमेदवार उभा करणार नाही; पण 'ही' अट पूर्ण करा - मराठा समाज आक्रमक - Lok Sabha Elections
- Ashok Chavan Gherao : अशोक चव्हाणांना मराठा समाजाने घातला घेराव, चव्हाणांनी घेतला काढता पाय - Ashok Chavan Vs Maratha Community