मुंबई Supriya Sule On Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर 'इंडिया' आघाडीत उभी फूट पडल्याचं दिसतयं. ममत बॅनर्जींनंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनंही पंजाबमध्ये स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे आता इंडिया आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याची चिन्हं आहेत.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे : या घडामोडीनंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीसोबतच निवडणुका लढतील, असं त्या म्हणाल्या. "ममता बॅनर्जी 'इंडिया' आघाडीच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शिका आणि आमच्या प्रिय नेत्या आहेत. आघाडीचं जागा वाटपाचं मॉडेल प्रत्येक राज्यात वेगळं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जरी त्या वेगळ्या निवडणूक लढल्या, तरी त्यांचे जेवढे उमेदवार निवडून येतील ते 'इंडिया' आघाडी बरोबरच असतील", असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
मतभेद असतील मनभेद नाही : "ममता बॅनर्जींवर आमच्या सर्वांचं प्रेम आणि विश्वास आहे. त्या गेल्या दहा वर्षापासून संसदेमध्ये आमच्या सोबत आहेत. येणाऱ्या काळात आम्ही एकत्र सत्तेत येऊ आणि देशाची सेवा करू. आमच्यात मतभेद असतील, मात्र मनभेद नाहीत", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे याविषयी मला काही माहिती नसून, महाराष्ट्रात मात्र बेरोजगारी, महागाई अशा प्रकारचे मोठे आव्हानं असल्याचं त्या म्हणाल्या.
मी फक्त आईला घाबरते : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंकडे गेली, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "शरद पवार साठ वर्षांच्या राजकारणात 5 चिन्हावर निवडणूक लढले. अजित पवार गटाकडे पक्ष गेला तर मी घाबरत नाही. मी फक्त आईला घाबरते", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे वाचलंत का :