मुंबई Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाल 27 जुलै रोजी संपत असल्याकारणानं, या जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे तर त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी पार पडणार आहे. विधानसभेच्या आमदारांकडून विधान परिषदेच्या सदस्यांसाठी मतदान होणार असल्यानं आणि हे मतदान गुप्त पद्धतीनं असल्याकारणानं सर्वच राजकीय पक्षात या 11 जागांसाठी चुरस रंगणार आहे.
अटीतटीची रंगतदार होणार निवडणूक : विधान परिषदेच्या 12 सदस्यांचा कार्यकाल 27 जुलै रोजी संपत असल्यानं या जागांसाठी निवडणूक कधी लागते याकडं सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष होतं. विधानसभेतून निवडून द्यायच्या या 11 जागांसाठी अखेर 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे. याकरता निवडणूक आयोगाकडून 25 जून रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांवर लक्ष : राज्यात आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या विधान परिषदेच्या 11 जागांवर लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आल्यानं त्यांचं मनोबल उंचावलं आहे. त्यातच राज्यातील 150 पेक्षा अधिक मतदार संघात त्यांना आघाडी मिळाली असल्याकारणानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून केला जात आहे. त्यामुळं ही निवडणूक अटीतटीची आणि रंगतदार होणार आहे.
असे असणार गणित : विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 10 जागा या आमदारांच्या राजीनाम्यामुळं तर 4 जागा या आमदारांच्या निधनामुळं रिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये 274 विधानसभा सदस्यांमधून 11 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या कारणानं पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यामध्ये घट झाली आहे. भाजपा त्यांच्या 5 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच एकनाथ शिंदे गट अजित पवार गटही प्रत्येकी 2 जागांसाठी प्रयत्न करतील. काँग्रेसचे 2 सदस्य जरी निवृत्त होत असले तरी त्यांचा 1 सदस्य सहज निवडून येईल. परंतु दुसऱ्या सदस्यासाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यातच शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्याकडं स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी सुद्धा पुरेसे संख्याबळ नसल्याकारणानं त्यांना मतांसाठी जुळवा जुळवी करावी लागणार आहे.
निवृत्त होणारे सदस्य व त्यांचे पक्ष :
१) विजय गिरकर (भाजपा)
२) निलय नाईक (भाजपा)
३) रमेश पाटील (भाजपा)
४) रामराव पाटील (भाजपा)
५) महादेव जानकर (भाजपा मित्र पक्ष)
६) अनिल परब (उबाठा गट)
७) मनीषा कायंदे ( शिंदे गट)
८) डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस)
९) डॉ. वजाहत मिर्झा (काँग्रेस)
१०) अब्बदुल खान दुराणी (राष्ट्रवादी अजित पवार गट)
११) जयंत पाटील (शेकाप)
- निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल
नोटिफिकेशन : मंगळवार 25 जून 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : मंगळवार 2 जुलै 2024
उमेदवारी अर्जांची छाननी : बुधवार 3 जुलै 2024
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : शुक्रवार 5 जुलै 2024
मतदान : शुक्रवार 12 जुलै 2024
मतदानाची वेळ : सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
मतमोजणी : शुक्रवार 12 जुलै 2024 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याचा दिनांक : मंगळवार 16 जुलै 2024
हेही वाचा -