मुंबई Tisari Aghadi : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. एकीकडं महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडं या दोन्ही आघाड्यांमध्ये सामील न होणाऱ्या पक्षांची तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि प्रहार संघटना यांच्यासह अन्य छोट्या पक्षांचा समावेश करायचा होता. मात्र, बच्चू कडू यांच्याबाबतीत सुरुवातीलाच मिठाचा खडा पडला. राजू शेट्टी यांनीही केवळ चर्चाच केली. तर मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याबाबत प्रकाश आंबेडकर आग्रही होते. परंतु, त्यांच्या भूमिकेशी समर्थन होऊ न शकल्यानं तो मार्गही बंद झाला.
तिसरी आघाडी नव्हे समविचारी पक्षांची आघाडी : यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं, "आपण या आघाडीला कुठलंही नाव दिलेलं नाही. त्यामुळं त्याला तिसरी आघाडी संबोधणं उचित नाही. आम्ही जास्तीत जास्त समविचारी पक्षांना सोबत घेऊन त्यांची ताकद एकत्र करून या दोन्ही आघाड्यांना शह देणार असल्याचं स्पष्ट केलं. तसंच शेट्टी यांच्यासोबत चर्चा चालू होती. मात्र, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद आलेला नाही," असंही ते म्हणाले.
...त्यामुळं घेतला वेगळा निर्णय : या संदर्भातमाध्यमांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धांत मोकळे यांनी सांगितलं की, "संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांना समर्थन दिलंय. मनोज जरांगे यांची मागणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, अशी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं. मात्र ते ओबीसीतून मिळावं, अशी आमची भूमिका नाही. त्यामुळं या प्रश्नावर मनोज जरांगे आणि आमची परस्पर विरोधी भूमिका आहे. संभाजीराजे यांनी जरांगे यांना सोबत घेतल्यानं आता जरांगे आणि संभाजीराजे हे आमच्यासोबत वैचारिक पातळीवर येऊ शकत नाहीत. तर दुसरीकडं बच्चू कडू यांच्याशीही आमचे जुळणे शक्य नाही. राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू असली तरी त्यांनीही संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. त्यामुळं आमच्यासाठी हे पर्याय आता जवळपास बंद झालेत. म्हणूनच आम्ही गोंडवाना पार्टी आणि भारतीय आदिवासी पार्टी तसंच ओबीसी संघटनांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय केलाय."
आम्हाला फरक पडणार नाही : याविषयी बोलताना भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, "तिसरी आणि चौथी आघाडी निर्माण झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. कारण, राज्यातील जनता ही महायुतीसोबत आहे. आगामी निवडणुकीत महायुतीचाच निश्चित विजय होईल, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळं या आघाड्यांचे आपापसात का बिनसलंय? जुळलं तरी त्याचा त्यांना किती फायदा होईल याची खात्री नाही. परंतु, महायुतीला आगामी निवडणुकीत निश्चित फायदा होईल", असा दावा उपाध्ये यांनी केलाय.
हेही वाचा -
- "एकेका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता"- बच्चू कडूंचं निवडणुकीपूर्वी मोठं वक्तव्य - Bachchu Kadu
- "तिसरी आघाडी तयार केली तर लोक सुपारीबाज पक्ष म्हणून बघतील..." रोहित पवार यांची टीका - Rohit Pawar news
- निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांची मोठी खेळी, तिसरी आघाडी स्थापन करणार? - Prakash Ambedkar On Third Aghadi