मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे, मुंडे, तटकरे, क्षिरसागर, भोसले, देशमुख, आत्राम ही प्रतिष्ठित घराणी काका- पुतण्याच्या वादावरून चर्चेत आली आहेत. राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या सारख्या दिग्गज नेत्यालाही स्वतःच्या घरातील काका-पुतण्यातील वाद मिटविण्यात अपयश आलंय.
सर्वात जास्त धोका जवळच्या नातेवाईकांकडूनच : महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यातील वादाची अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याचा वाद मागील दोन दशकांपासून गाजत आलाय. अनेकदा यामध्ये पुतणे वरचढ ठरले आहेत. तर अनेकदा काकांनी पुतण्यांना दिवसा तारे दाखवले आहेत. अलीकडच्या काळातील राजकारणावर नजर टाकली तर असं लक्षात येतं की, राजकारणात सर्वात जास्त धोका हा जवळच्या नातेवाईकांकडूनच असतो. काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात सुरू असलेला संघर्ष हा नवीन नसून ती इतिहासाची पुनरावृत्ती आहे, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी सांगितलं.
काका पुतण्याच्या वादाची सुरुवात : माईणकर यांच्या यांच्यामते, "बारामतीच्या राजकारणात पुतणे अजित पवार यांना राजकारणाचे धडे काका शरद पवार यांच्यापासून भेटले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत काकांनी पुतण्याला संधी दिली. अजित पवार यांच्या वडिलांच्या निधनानंतर इतर पुतणे रांगेत असतानाही, शरद पवारांनी अजित पवारांना पुणे जिल्ह्याच्या राजकारणात संधी दिली. परंतु एका ठराविक काळ मर्यादेनंतर काकांनी राजकारणातून निवृत्त व्हायला हवं आणि आपल्या हाती सत्ता द्यायला हवी, असं अजित पवारांना वाटू वाटलं. परंतु तसं होताना दिसत नाही, या कारणानं अजित पवारांनी पक्षात बंडखोरी केली. काका-पुतण्याच्या वादाची ही काही पहिली सुरुवात नव्हती. असं अनेक वाद यापूर्वीही राजकारणात झाले आहेत.
ठाकरे, मुंडे परिवारातील काका-पुतण्या वाद : 2002 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी अधिकृतरित्या पक्षाचा राजकीय वारस म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केल्यावर त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी आपल्याच विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे असं सांगत, शिवसेनेतून वेगळी वाढ धरली. परंतु राज ठाकरे यांनी अजित पवार प्रमाणे पक्षाचं नाव आणि चिन्ह पळवळ नाही, तर स्वतःची ताकद निर्माण करून शिवसेनेची ताकद कमी केली. बीडमध्ये काका गोपीनाथ मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्यातील वादही महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत आहे. राष्ट्रीय राजकारणात गोपीनाथ मुंडे यांनी रस घातल्यानंतर बीडचं राजकारण धनंजय मुंडे यांच्याकडं सोपवलं. बीड जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदापासून विधानपरिषदेत आमदारापर्यंत धनंजय मुंडे यांना संधी दिली. परंतु 2009 च्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. येथूनच काका-पुतण्यांचं बिनसलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव करून धनंजय मुंडे यांनी याचा बदला घेतला.
तटकरे कुटुंबातील काका - पुतण्या वाद : रायगडमध्ये काका सुनील तटकरे विरुद्ध पुतण्या अवधूत तटकरे हा वाद 2016 सालापासून उदयास आला. सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांचा अवधूत तटकरे हा मुलगा. सुनील तटकरे यांनी अवधूत तटकरेला रोहा शहराचं नगराध्यक्षपद ते आमदार अशी संधी दिली. परंतु सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे यांचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर यांच्या कुटुंबातील वाद वाढला. पुढे सुनील तटकरे यांनी त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे यालाही राजकारणात आणले. याबाबत खुद्द शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात यश आलं नाही. अखेर अवधूत तटकरे यांनी भाजपा प्रवेश केला. पण आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यानंतर यामध्ये काकाने पुतण्यावर बाजी मारली असं दिसून आलं.
हेही वाचा -